दक्षिण नागपूर मतदारसंघात यंदा मतविभाजनाबरोबरच पंचरंगी काटय़ाची लढत अटळ असून दहा वर्षांपूर्वी हातातून निसटलेला हा गड पुन्हा मिळविण्यासाठी गडकरींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाची मात्र कसोटी लागली आहे.
दक्षिण नागपूर मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा गड समजला जातो. १९७८ ते १९८५ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ खेचून आणण्याचा भाजपचा प्रयत्न १९८५ पासून होता. १९९५ मध्ये भाजपचे वाडिभस्मे यांनी खेचून आणलेला हा मतदारसंघ १९९९ मध्ये मोहन मते यांनी कायम राखला. काँग्रेसचे गोविंदराव वंजारी यांनी २००४ मध्ये तो परत मिळविला. २००९ मध्ये हा मतदारसंध शिवसेनेला गेल्यामुळे मोहन मते यांनी बंडखोरी केली. मतविभाजनाचा फायदा घेत काँग्रेसचे दीनानाथ पडोळे यांनी तो कायम ठेवला. यंदाही हा मतदारसंघ मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी भाजपची कसोटी लागली आहे. शिवसेनेसोबतची युती तुटल्याने भाजपला स्वत:चा उमेदवार िरगणात उतरविण्याची संधी मिळाली.  
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारास १ लाख ५ हजार मते मिळाली. त्या आधारे भाजप उत्साहात आहे. रिपाइंचे खोब्रागडे व आठवले हे दोन मोठे गट, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, शिवसंग्राम यंदा भाजपसोबत आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात दलित, मराठा मते मिळण्याची आशा भाजपला आहे. यंदाही अठरा उमेदवार िरगणात असले तरी पंचरंगी काटय़ाची लढत अटळ आहे. पूर्व नागपूरचे अनेकदा प्रतिनिधित्व केलेल्या सतीश चतुर्वेदी यांच्या जुन्या मतदारसंघातील ७० टक्के भाग या मतदारसंघात आहे. काँग्रेसकडे हा मतदारसंघ कायम ठेवण्यास व पुन्हा आमदारकी मिळविण्यास चतुर्वेदींनी सारी शक्ती पणाला लावली आहे. आमदारकी टिकविण्यासाठी राकाँचे दीनानाथ पडोळे यांनी जोर लावला आहे. शिवसेनेचे किरण पांडव व बंडखोर अपक्ष शेखर सावरबांधे यांच्यात मत विभाजन अटळ आहे. चतुर्वेदी, पडोळे, बसपच्या सत्यभामा लोखंडे यांच्यासोबत भाजपच्या सुधाकर कोहळे यांना लढावे लागणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान उमेदवाराशिवाय आणखी चौघे उमेदवारीसाठी उत्सुक होते. एक विद्यमान नगरसेवक उमेदवारीच्या आशेने भाजपवासी झाला. उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा एका घटक पक्षाने दिला होता. हे कानी गेल्यानंतर गडकरींनी खडसावल्याने हे बंडोबा प्रचारात दिसू लागले आहेत.
नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदी प्रमुख नेत्यांचे या मतदारसंघात बारकाईने लक्ष असून अतिव्यस्ततेतून वेळ काढत या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. एकीकडे मतविभाजन अटळ असले तरी पंचरंगी काटय़ाची लढत असल्याने हा मतदारसंघ मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पक्षाची मात्र कसोटी लागली आहे.