भ्रष्टाचाराच्या विरोधात समर्थपणे उभे राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांचा खून पाडायलाही लोक भिणार नाहीत, अशी शंका व्यक्त करून त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा संकल्प सोडणारे विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी केजरीवाल यांच्या ‘आम आदमी’ पक्षात प्रवेश करण्यास मात्र, स्पष्ट नकार दिला. फॉरवर्ड ब्लॉक आणि डावे पक्ष वगळता बहुतेक पक्ष हे भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत तर त्यांचे नेते भ्रष्टाचाराचे ‘सरगणा’ असल्याचे प्रतिपादन करीत जांबुवंतराव धोटे यांनी अरविंद केजरीवाल यांची जबरदस्त तारीफ करीत अण्णा हजारेंना मात्र, चपराक दिली.
भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणत्याही पक्षाने जाहीरनाम्यात स्पष्ट भूमिका घेतली नसून राजकारणात येण्यापूर्वी अतिशय गरीब असलेला राजकारणी राजकारणात आल्याबरोबर एकदम कोटय़धीश, अब्जाधीश कसा होतो? त्याचा स्रोत काय आहे. या खोलात जायला कोणीही तयार नाही. जातीच्या नावावर राजकारण होत आहे. मी माळी असल्यामुळे मला ‘टार्गेट’ केले जाते, असे छगन भुजबळसारखे मंत्री नाशिक येथे बोलतात, ही राष्ट्राची शोकांतिका आहे. जात एक शक्ती बनली आहे. हे तर पुतळ्यांचे, स्मारकांचे राज्य आहे. इंदू मिल, शाहू मिलच्या जागेसाठी भांडणारे बहादुरीने जागा मिळाल्याचे सांगत आहेत. देशासाठी केवळ पुतळ्यांचे राजकारण करणार काय? अशी संतप्त प्रतिक्रिया धोटे यांनी व्यक्त केली.
केजरीवाल भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत. डावे, उजवे किंवा मध्यमार्गी याच्याशी त्याचा संबंध नाही. केजरीवाल एकटा पडला असून अण्णा हजारेंनी त्याच्याशी संबंध तोडले आहेत. कामापुरता, मतलबापुरते समोरच्याला वापरणे हा अण्णांचा इतिहास असल्याची टीका जांबुवंतराव यांनी पत्रकारांशी केली.
 अण्णांनी जंतरमंतरवरील त्यांच्या आंदोलनात राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल, अशी भूमिका घेतली होती मात्र, केजरीवालांनी ती स्थापन करताच हजारे विरोधात गेले. ज्यांच्यावर टीका केली. ज्यांचे बिंग फोडले, ज्यांचे भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणले असे लोक केजरीवाल यांचा खून पाडायलाही भिणार नाहीत. हे लोक सुपारी घेणारे आणि सुपारी देणारे आहेत. सत्याचा आवाज दाबण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जावू शकतात. अरविंद केजरीवालांना पाहिले नाही. ते आदर्श, देशभक्तीचे काम करतात. त्यांचे काही लोक केव्हा तरी भेटायला आले होते. त्यांचा पक्षात सामील करण्यास इच्छुक नाही. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असे धोटे म्हणाले.