कावळ्याच्या थव्याने हल्ला करून घायाळ केलेल्या घुबडाला वन कर्मचाऱ्यांमुळे जीवदान मिळाले. महाबळेश्वर येथील लिंगमळा वन विश्रामगृहात कावळ्यांनी हल्ला केल्यामुळे जखमी झालेले ‘घुबड’ जमिनीवर घायाळ अवस्थेत पडल्याचे येथील वनरक्षक सुनील लांडगे यांच्या लक्षात आले. तातडीने त्यांनी जखमी पिलास उचलून त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. महाबळेश्वरचे वरिष्ठ वनक्षेत्रपाल महाबळेश्वर एस. एम. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. त्यास पाणी, दूध व खाद्य दिल्यानंतर तरतरी आली. त्यानंतर त्यावर काही तास देखरेख ठेवून ते सुस्थितीत आल्यावर त्याला पुन्हा लिंगमळा विश्रामगृह परिसरात सोडून देण्यात आले. या वेळी वनरक्षक सुनील लांडगे यांच्यासह महाबळेश्वरचे वनपाल डी. एस. उबाळे, वनकर्मचारी रघुनाथ धुमाळ यांनीही मोठी भूमिका पार पाडली
वनाधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार हे घुबड बदामी या दुर्मिळ जातीचे असून त्याचा रंग आकर्षक बदामी होता. ते तीन महिन्यांचे पिलू असावे. त्याच्या चोचीची लांबी ४ सें.मी., टोकदार नख्यांसह पायापर्यंतची उंची १५ सें.मी. तर डोक्यापासून शेपटीपर्यंतची लांबी ३० सें.मी. होती. वनस्पती रक्षणाबरोबरच वन्यजिवाचे रक्षण करून त्याला जीवदान दिल्याबद्दल वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.