कळंबोली येथील सेंट जोसेफ विद्यालयाचा विद्यार्थी विघ्नेश साळुंके याच्या मृत्यू प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मंगळवारी शाळेमध्ये घेतलेल्या बैठकीतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रकार घडला.
सेंट जोसेफ विद्यालयाचा विद्यार्थी विघ्नेश साळुंके याचा शुक्रवारी शाळेच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. विघ्नेशच्या मृत्यूबाबत शाळा व्यवस्थापनाने जबाबदारीचे हात झटकल्याने पालक संतप्त झाले होते. या संतापाचा परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी कळंबोली संघर्ष कृती समिती व पालकांसोबत शाळा व्यवस्थापनाची मंगळवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राजकीय नेते, कार्यकर्त्यांचाही समावेश होता. बैठकीत शाळेच्या मुख्याध्यापकांचीच बाजू घेण्याचा प्रयत्न एका शिक्षिकेने केल्यामुळे येथे उपस्थित पालकांनी प्रचंड गोंधळ घातला. मुख्याध्यापकांना निलंबित आणि त्या शिक्षिकेवरच कारवाई करा त्याशिवाय बैठक पुढे चालू देणार नाही या मागणीसाठी संतप्त पालकांनी आंदोलनाचाच पवित्रा घेतला. त्यामुळे येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या दोन्ही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालक शांत झाले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी विघ्नेशच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे अशी विचारणा केली त्या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांनी तपासाची दिशा विशद केली. या घटनेमध्ये पोलिसांना विद्यार्थ्यांकडून माहिती मिळविण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले.
शाळेला बाऊंसरचे कवच
संतप्त पालकांच्या उत्तरांना तोंड देण्यापूर्वी शाळा व्यवस्थापनाने यावेळी बाऊंसर सुरक्षेचे कवच परिधान केले होते. पालकांसोबत बैठक सुरू असताना त्या बैठकीमध्ये हे बाऊंसर उपस्थित होते. प्रसारमाध्यमांनी या बाऊंसरचे छायाचित्र काढत असताना आंदोलन अजून चिघळू नये यासाठी नंतर या बांऊसर तरुणांना तातडीने शाळेत लपविण्यात आले. पालकांच्या एकतेची ताकद मोडून काढण्यासाठी सेंट जोसेफ विद्यालयाच्या व्यवस्थापनाने बाऊंसरकरवी पालकांचा बंदोबस्त करण्याचे नियोजन आखल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते सुदाम पाटील यांनी यावेळी केला आहे. विशेष म्हणजे शाळेतील ही बैठक पोलिसांनी आयोजित केली होती. त्यामुळे या बैठकीची जबाबदारी पोलिसांची असताना शाळेने येथे बाऊंसररक्षक नेमल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. अखेर पोलीस निरीक्षक दिलीप पांढरपट्टे यांना या बाऊंसर रक्षकांना बैठकीतून जाण्यास सांगणे भाग पडले.

मृत्यूस शाळा व्यवस्थापनच जबाबदार – गटशिक्षणाधिकारी
सहा महिन्यांपूर्वी न्यू होरायझन शाळेत गौरव कंक या विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर पनवेल परिसरातील ५१४ शाळांना सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे लेखी नोटिसीद्वारे शिक्षण विभागाने सांगितले होते. या नोटिसीकडे शाळा व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी विघ्नेश साळुंकेच्या दुर्दैवी मृत्यूस सुरक्षा कारणीभूत ठरली आहे. विघ्नेशच्या मृत्यूस सेंट जोसेफ शाळेचा हलगर्जीपणा जबाबदार असून शाळेची पूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याध्यापिकेची असल्यामुळे या प्रकरणात मुख्याध्यापिकेवर शिक्षण विभाग कारवाई करेल असे आश्वासन पनवेलचे गटशिक्षण अधिकारी साबळे यांनी या वेळी दिले.

मृत्यूमागे कौटुंबिक कलह दाखविण्याचा प्रयत्न
कौटूंबिक कलहातून विघ्नेशने हे पाऊल उचलल्याचे पोलीस सिद्ध करी पाहत असल्याबद्दल विघ्नेशच्या पालकांनी या वेळी संताप व्यक्त केला. विघ्नेशच्या मृत्यूनंतर दोन दिवसांत लोखंडी ग्रिल प्रत्येक पॅसेजला सेंट जोसेफ शाळेने लावल्या, मात्र हेच ग्रिल दुर्घटनेअगोदर बसविले असते तर आज माझा विघ्नेश वाचला असता. विघ्नेशच्या मृत्यूनंतर प्रत्येक शिक्षक मजल्यांवर उभे आहेत मात्र ही दुर्घटना घडण्यापूर्वी का नव्हते असा सवाल साळुंके यांनी उपस्थित करून विघ्नेशचे वडील साळुंके यांनी या प्रकरणी शाळेला दोषी ठरविले. सीसीटीव्हीचे चित्रीकरण व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी कर्मचारी नेमणे आवश्यक असते. परंतु त्याबाबतही निष्काळजीपणा दाखविण्यात आला असल्याचे साळुंके यांचे म्हणणे आहे. शाळेची दंडेलशाही सुरू असल्याची सर्व पालकांचीच तक्रार आहे. परंतु शाळेविरोधात गेल्यास आपल्या पाल्याचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती त्यांना आहे याकडेही साळुंके यांनी पोलिसांचे आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.