‘एमकेसीएल’च्या माध्यमातून मांडलेली ‘डिजिटल युनिव्हर्सिटी’ची जी संकल्पना देशभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांना राबविणे शक्य झाले नाही, ती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रभावीपणे राबविली आहे. मुक्त विद्यापीठाचे हे कार्य इतर विद्यापीठांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा शुक्रवारी राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली तर डॉ. भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. दीक्षांत सोहळ्यात १ लाख ३२ हजार ३२७ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका देण्यात आली. त्यात राज्यातील विविध कारागृहात असणाऱ्या ६९ बंदीजनांचा समावेश आहे. हा धागा पकडून भटकर यांनी बंदीजनांना कौशल्याधारीत शिक्षण देण्याच्या उपक्रमाचे कौतुक करत कारागृहे शिक्षणगृह बनली पाहिजेत असे मत व्यक्त केले.
गंगापूर गावालगतच्या विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, आ. सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप यांच्यासह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्या सागरराव यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करताना नितीमत्ता व मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. दीक्षांत भाषणात भटकर यांनी विद्यापीठाच्या अनोख्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले. उद्योगांच्या मागणीनुसार कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे विद्यापीठाने निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने कारखान्यांच्या मागणीनुसार खास अभ्यासक्रमांची निर्मिती केली जात आहे. दीडशेहून अधिक अभ्यासक्रम आणि पावणे सात लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे हे खऱ्या अर्थाने ‘मेगा विद्यापीठ’ असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांनी देशात पहिल्या विद्यापीठाची स्थापना केली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत ७०० विद्यापीठ स्थापन झाली आहेत. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मुक्त विद्यापीठाने अतिशय कमी वेळात अनेक आव्हानांचा सामना करत मुक्त शिक्षणात अव्वल स्थान गाठले. भ्रमणध्वनीवर शिक्षण, डीटीएच व्यवस्था आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर विद्यापीठ करत असल्याचे त्यांनी नमूद केले. दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने जीवनातील महत्वपूर्ण टप्पा विद्यार्थ्यांनी गाठला आहे. जीवनातील पुढील प्रवासाला सुरुवात करताना प्रत्येकाने आई-वडील व गुरुजन यांनी घेतलेल्या परीक्षमांचे अवलोकन करावे असे आवाहन त्यांनी केले. भारतीय संस्कृतीचे महत्व अधोरेखीत करताना ही जगातील एकमेव प्राचीन असुनही नुतन स्वरुपात प्रगट होणारी संस्कृती आहे. १० हजार वर्षांत अनेक संस्कृती उदयास आल्या आणि शिखरावर पोहोचून लयास गेल्या. मात्र, या घडामोडीत प्रगत स्वरुपात टिकलेली एकमेव भारतीय संस्कृती असून विद्यार्थ्यांनी तिचे संवर्धन करावे असे आवाहन भटकर यांनी केले.
कुलगुरु डॉ. साळुंखे यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. तळागाळातील घटकांना शिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य विद्यापीठ यशस्वीपणे करत आहे. उद्योग-शिक्षण समन्वयाचे धोरण विद्यापीठाने अवलंबले. ‘शिका व कमवा’ योजनेतून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कुशल कर्मचारी निर्माण करण्याच्या श्रृंखलेत नपाते फाऊंडेशनच्या माध्यमातून रुग्ण सहाय्यक शिक्षणक्रम राबविला जातो. संगणकीय प्रणालीच्या वापराने नोंदणीपासून परीक्षेपर्यंत सुसूत्रता आली. त्याचा परिणाम म्हणून सर्वच परीक्षांचे निकाल २५ ते ४५ दिवसांच्या आत लावणे शक्य झाले. बेव रेडिओच्या माध्यमातून शिक्षक-विद्यार्थी संवाद घडविणारे हे एकमेव विद्यापीठ असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली माहिती अचूक मिळावी यासाठी किऑस्क यंत्रणेचा वापर सुरू केला जात आहे. या व्यतिरिक्त भ्रमणध्वनीच्या माध्यमातून अध्ययन साहित्य दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

हेलिकॉप्टरमुळे व्यत्यय..
दीक्षांत सोहळ्याच्या सुरुवातीला हेलिकॉप्टरच्या आवाजाने कुलगुरुंच्या भाषणात व्यत्यय आणला. सोहळ्याचे अध्यक्ष राज्यपाल महोदयांसाठी विद्यापीठाने प्रांगणात खास हेलिपॅडची निर्मिती केली. सोहळ्यासाठी उभारलेल्या शामियानालगत हे हेलिपॅड होते. कार्यक्रमास सुरुवात झाल्यानंतर हेलिकॉप्टरची जमिनीवर घरघर सुरू झाली. कुलगुरुंचे भाषण सुरू झाल्यावर ते आकाशात उडाले. साधारणत: १० मिनिटे हेलिकॉप्टरच्या आवाजाने उपस्थितांना भाषणही नीट ऐकता आले नाही. हेलिकॉप्टर आकाशात झेपावल्यावर सर्वाचे लक्ष विचलीत झाले.

सीमेवर ज्ञानदानात अवरोध
देशाच्या सीमेवर तैनात जवानांपर्यंत उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था मुक्त विद्यापीठाने वेगवेगळ्या अभ्यासक्रमांद्वारे केली होती. देशाच्या सीमांचे हजारो मराठी जवान व अधिकारी संरक्षण करीत आहेत. त्यांना मराठी भाषेतून शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे. परंतु, विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांच्या कार्यकक्षेला राज्यांच्या सीमांची मर्यादा घातल्यामुळे विद्यापीठाला सुरू केलेले शिक्षणक्रम थांबवावे लागले. कुलगुरुंनी त्याची माहिती देऊन राज्यपालांनी लक्ष घातल्यास विद्यापीठाची कार्यकक्षा वाढवून मिळाल्यास मनुष्यबळ मंत्रालयाच्या मदतीने जवानांसोबत देशभरातील मराठी भाषकांना हे विद्यापीठ शिक्षण देऊन शकेल याकडे लक्ष वेधले.

६९ बंदीजनांनाही पदवी
दीक्षांत सोहळ्यात एक लाख ३२ हजार विद्यार्थ्यांना पदविका व पदवी प्रदान करण्यात आली.  त्यात ५१ हजार ०४ विद्यार्थिनी तर ८१ हजार ३२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्यातील सहा कारागृहातील ६९ बंदीजनांनी पदवी ग्रहण केली. यावेळी वेगवेगळ्या शिक्षणक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या शाखांच्या १६ विद्यार्थ्यांना १७ सुवर्णपदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली आहे. २८ विद्यार्थ्यांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. २७ हजार १९० पदविका, ९८ हजार ४२६ पदवी, ६ हजार ६९१ पदव्युत्तर पदवी आदींचा समावेश आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची यादी बरीच लांबलचक असली तरी बीबीए, एम. आर्च (जनरल), बी. टेक् (मरीन इंजिनिअरिंग), एम.एस्सी (जैवतंत्रज्ञान). एमएस्सी (एचटीएम), बीएस्सी (बीआयएस) या अभ्यासक्रमाची परीक्षा झाली की नाही याची स्पष्टता होऊ शकली नाही. कारण, सुवर्ण पदक वा पारितोषिकांच्या यादीत उपरोक्त अभ्यासक्रमात कोणीही पात्र ठरले नसल्याची नोंद होती. हे अभ्यासक्रम सुरू आहेत की नाही याची स्पष्टता झाली नाही.