भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या बांगलादेश युद्धातील निर्णायक विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेले एक तप कराडच्या शिवाजी स्टेडियमवर यशस्वी रीत्या भरविण्यात येणारा विजय दिवस समारोह १४ ते १७ डिसेंबर ऐवजी यंदा २० ते २३ डिसेंबर या कालावधीत परंपरेनुसार भरगच्च कार्यक्रमाने साजरा होत आहे.
या कार्यक्रमाला २० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता विजय दिवस चौक येथून शोभयात्रेने प्रारंभ होईल. संपूर्ण शहरातून देशाभिमान वृद्धिंगत करणारी ही मिरवणूक समारंभस्थळी विसावेल. सायंकाळी पाच वाजता लिबर्टी मैदानावर  शस्त्रास्त्र, औद्योगिक व शेतीविषयक प्रदर्शनाचे उदघाटन समारंभपूर्वक होणार आहे. २१ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता दत्त चौकातून निघणाऱ्या कराड दौड अर्थात ‘रन फॉर कराड’ला प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन येथे सैनिक संमेलन होईल. सायंकाळी ६ वाजता घाट येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २२ डिसेंबर सकाळी आठ वाजता लिबर्टी हॉल येथे रक्तदान शिबिर होईल. सायंकाळी  साडेसहा वाजता वेणूताई चव्हाण हॉल येथे मानपत्र व जीवन गौरव पुरस्काराचे वितरण होईल. सायंकाळी ७ ते रात्री साडेनऊ या वेळेत चव्हाण हॉल येथे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. २३ डिसेंबर रोजी दुपारी २ ते सायं. साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे विजय दिवस समारोहाचा मुख्य कार्यक्रम होईल. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वेणुताई चव्हाण हॉल व छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे फक्त जवानांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.