ब्रिटीश पूर्व कालखंडात १९०९ साली ब्रिटीशांच्या राजवटीत विजयानंदवर डौलाने उभा राहिलेला भारतीय राष्ट्रध्वज.. ब्रिटीश राजवटीतच जिल्हाधिकारी जॅक्सन याची झालेली हत्या.. यासहभारताला स्वातंत्र्य मिळाले त्या सुवर्णक्षणाचा साक्षीदार असणारे विजयानंद चित्रपटगृह शुक्रवारी शतक महोत्सवात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधत विजयानंद आणि जे.सी.आय. अंबड यांच्यावतीने मार्च २०१४ ते मार्च २०१५ या वर्षभरात ‘सिनेसृष्टीचे शतकोत्सव’ या संकल्पनेवर ‘विजयानंद महोत्सव’ची आखणी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चित्रपट गृहाचे संचालक विनयकुमार चुंबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिकमध्ये दादासाहेब फाळके यांच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीचे बीज रोवले गेले. मात्र नंतरच्या काळात सिनेसृष्टी फुलविण्याचे काम येथील विजयानंद चित्रपटगृहाने केले. आजवरच्या १०० वर्षांच्या कालावधीत हजारहून अधिक मराठी चित्रपट विजयानंदच्या माध्यमातून प्रसिध्द झाले. यामुळे ‘मराठी चित्रपटांचे माहेरघर’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण झाली. राज्यात मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसताना विजयानंद त्यास अपवाद राहिले. १९०६ साली दामोदर शंकरशेठ चुंबळे यांनी चुंबळे अ‍ॅण्ड कंपनीच्या माध्यमातून ‘विजयानंद’ची तंबूच्या स्वरूपात ब्रिटीश राजवटीत मूहुर्तमेढ रोवली. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या विजयानंदमध्ये १९०९ मध्ये जॅक्सन हत्येने वेगळा संदर्भ जोडला गेला. १९१४ मध्ये दामोदर चुंबळे यांनी आज दिसणारी नवी वास्तु उभारली. पुढील १०० वर्षांत तिच्यावरचे रंग बदलतील, अंतर्गत तंत्रज्ञानात काही बदल होतील, मात्र वास्तुची बाह्यरचना अशीच असेल असा विश्वास चुंबळे यांनी व्यक्त केला. विजयानंदच्या आजवरच्या वाटचालीची दखल घेऊन विविध संस्थांनी आजवर ६० हुन अधिक पुरस्कारांनी चित्रपटगृहास सन्मानित केले आहे.
अलीकडेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून सिनेसृष्टीच्या शतकोत्सवानिमित्त विजयानंद चित्रपगृहाच्या शिरपेचात सुवर्ण पदकाचा तुरा रोवला. पुणे येथील प्रभात सोहळ्याच्यावतीने पुरस्कार जाहीर झाला असून जूनमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे वितरण होणार असल्याचे चुंबळे यांनी सांगितले.
विजयानंदची चित्रपटगृह ओळख असली तरी नाटय़गृह, मंगल कार्यालय ते चित्रपटगृह हा त्याचा प्रवास राहिला. मराठी चित्रपटांना फारसा प्रेक्षक वर्ग लाभत नाही ही ओरड खोटी आहे. विजयानंदमध्ये आजवर कित्येक मराठी चित्रपट ‘हाऊसफुल’ झाले असून अनेक चित्रपटांनी रौप्य महोत्सव साजरा केला आहे. या संपुर्ण प्रवासात राज्य शासनाकडून फारसे सहकार्य मिळाले नसल्याची खंत चुंबळे यांनी व्यक्त केली. या जागेवर गगनचुंबी इमारत वा मॉल उभे करण्यासाठी अनेक बांधकाम व्यवसायिक तसेच काही मंडळींकडून तगादा सुरू आहे. मात्र ही वास्तु पुढेही रसिकांच्या सेवेसाठी अशीच तत्पर राहील यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. आगामी काळाची पावले ओळखून चित्रपटगृहाच्या तंत्रज्ञानात काही बदल केले आहे. प्रिंटवर चित्रपट न दाखवता उपग्रहाद्वारे सव्‍‌र्हर डाऊनलोड केल्याने त्याचे प्रक्षेपण दर्जेदार झाले आहे. अत्याधुनिक पॅनोसोनिक डय़ुएल लॅम्प अशी यंत्रणा कार्यान्वित असल्याने मल्टीप्लेक्सच्या तुलनेत विजयानंद आजही सर्वश्रेष्ठ आहे. चुंबळे घराची पाचवी पिढी या क्षेत्रात कार्यरत आहे. चित्रपटगृहाच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधत शुक्रवारी पूजा, महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. यानंतर चित्रपट गृहाच्या वाटचालीत पडद्यामागे राहुन महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या
कर्मचारी वर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सहकुटूंब सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शुक्रवारपासून पुढील १०० दिवस तसेच संपूर्ण वर्ष विजयानंद महोत्सव तसेच सिनेसृष्टी शतक महोत्सवांतर्गत विविध मनोरंजनात्मक, कलात्मक अशा कार्यक्रमाचे आयोजन जे.सी.आय. अंबड या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चुंबळे यांनी केले. यावेळी जेसीआयचे चैतन्य गुंजाळ, मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.