काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीरिपा, बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि लोकमंच या संयुक्त आघाडीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी सोमवारी सकाळी विदर्भ चंडिका मंदिर, शहीद चौक, इतवारी येथून पदयात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली. या पदयात्रेच्या संयोजिका महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्ष आभा पांडे होत्या. ही पदयात्रा तेलीपुरा, मंगळवारी, मारवाडी चौक, मस्कासाथ पूल, बारीपुरा, प्रेमनगर, यादव निवास, नारायणपेठ, लालगंज, नाईक तलाव या परिसरातून काढण्यात आली. सकाळी ९ वाजता सुरू झालेली पदयात्रा दुपारी १२.३० वाजता संपली.
विलास मुत्तेमवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी, २३ मार्चला सायंकाळी ७ वाजता कामठी रोड स्थित व्हाईट हाऊस लॉन येथे एक प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. लोकमंचचे संस्थापक सरदार अटलबहादूर सिंग, माजी खासदार गेव्ह आवारी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार शौकत कुरेशी, मधुकरराव वासनिक, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील, शेख हुसैन, सोनिया सिंग आदी उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. या शहराचा खासदार या नात्याने गेल्या ५ वर्षांत जवळपास ४०६८ कोटी रुपयांचा निधी या शहरासाठी खेचून आणला. यात केंद्राचा ५० टक्के, राज्याचा २० तर स्थानिक प्रशासनाचा ३० टक्के वाटा आहे, अशी माहिती विलास मुत्तेमवार यांनी सभेत बोलताना दिली.
संचालन अजय पाटील यांनी केले. तर आभार विकास ठाकरे यांनी मानले.