गोंदिया जिल्हा परिषदेत शाळांचा दर्जा वाढावा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा लोंढा खासगी शाळांकडे न वळता जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळावा व गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार शिक्षणासह भौतिक सुविधायुक्त असे आनंददायी वातावरणात शिक्षण दिले जावे, या उद्देशाने या जिल्हा परिषदेने गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळांसाठीच्या ‘गावची शाळा आमची शाळा’ हा बहुआयामी प्रकल्पाची दखल राज्य शासनाने घेतली असून ,असाच प्रकल्प राज्यातील ७५ हजार शाळांमध्ये राबविण्याची घोषणा नुकतीच ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी केली.
हे श्रेय जिल्ह्य़ात या प्रकल्पाकरिता काम करणाऱ्या सर्व यंत्रणेचे असल्याचे मत जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण व आरोग्य समिती सभापती विनोद अग्रवाल यांच्या संकल्पनेतून या जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या शाळांकरिता २०१२-१३ मध्ये हा बहुआयामी प्रकल्प सुरू करण्यात आला. यात शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यापासून तर भौतिक सुविधायुक्त वातावरण निर्मिती व्हावी, या अनुषंगाने एक समिती नेमून आराखडा तयार करण्यात आला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल २०१२ रोजी या प्रकल्पाचे थाटात उदघाटन करण्यात आले. विशेषत या प्रकल्पात या शाळांचा दर्जा वाढविणे, खासगी शाळांकडे जाणारा विद्यार्थ्यांचा लोंढा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आकर्षति व्हावा, भौतिक सुविधायुक्त वातावरण निर्माण व्हावे, शाळांमध्ये लोकसहभाग वाढावा व नावीन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेले वर्षभर शाळांमध्ये राहून विद्यार्थ्यांच्या सामान्य व व्यवहारिक ज्ञानात भर पडावी, या बाबींवर विशेष लक्ष देण्यात आला. याकरिता १२५ गुणांची प्रश्नावली तयार करण्यात आलेली असून यात लोकसहभागासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या भेटी व शाळांना पुरविण्यात आलेले विविध प्रकारचे साहित्याचा शाळा योग्य प्रकारे व वेळोवेळी वापर करतात किंवा नाही, यावर भर देण्यात आलेला आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये मूल्यांकन समितीचे गठन करण्यात आलेले असून प्रोत्साहन पर बक्षिसांची व्यवस्थासुद्धा जिल्हा परिषदेने केली आहे. याच संदर्भात विनोद अग्रवाल माहिती देतांना म्हणाले ,या प्रकल्पामुळे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यास सुरुवात झाली असून याचे उदाहरण स्वत अनुभवले आहे. ही गोंदिया जिल्ह्य़ातील शिक्षण क्षेत्राकरिता चांगली बाब असून यामुळे निश्चितच या शाळांकडून एक चांगली पिढी निर्माण होईल, तसेच शासनाचा असाच प्रकल्प राज्यातील ७५ हजार शाळांमध्ये राबविण्याची घोषणा ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी केली असून हे श्रेय  जिल्ह्य़ात या प्रकल्पात काम करणाऱ्या सर्व शिक्षक, कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे असून त्यामुळे आणखी जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.