त्र्यंबकेश्वर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जवळील कोजुली गावात कचरा डेपो तयार करण्यात येणार आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येईल. हा मुद्दा धरून या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
त्र्यंबक शहरातील निर्माल्य व कचऱ्याचा विषय गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. हरित लवादाने अलीकडेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पाश्र्वभूमीवर, घनकचरा प्रकल्प साकारण्याची निकड लक्षात घेऊन त्यास तातडीने जागा उपलब्ध करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे निर्माण होणारा कचरा टाकण्यासाठी कोजुली गावातील आठ एकर जागा अधिग्रहित करण्यात आली आहे. बाणगंगा काठच्या जागेवरील प्रस्तावित प्रकल्पास ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. जागा अधिग्रहित करण्याआधी पहिने व परिसरातील गावांच्या ग्रामसभांमध्ये त्याविषयी ठराव मंजूर न करता जमीन अधिग्रहित केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बाणगंगा नदीच्या काठावर व उताराची जागा आहे. याठिकाणी कचरा साठविल्यास त्यातील हानीकारक द्रव्य नदीमध्ये मिसळतील. हे अशुद्ध पाणी बाणगंगेबरोबर वाहून वैतरणा धरणात जाईल. या धरणातील पाणी गावे व शहरांना पुरविले जाते. त्या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल. दरम्यान, या बाबत पर्यावरण नियामक मंडळाकडून अभ्यास झालेला नाही. कचरा डेपोमुळे स्थानिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम, कचऱ्यामुळे होणारी दरुगधी, जल प्रदूषण याबाबत अहवाल अपेक्षित आहे. शासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता अधिग्रहित केलेली जमीन ग्रामपंचायतीला जमा करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.