News Flash

दुष्काळावर मात करण्यासाठी मांडवड ग्रामस्थांचे प्रयत्न

गावासाठी एखादा उपक्रम हाती घेऊन विकासाला हातभार लावणे हे आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावे लागेल. असे कार्य नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे करण्यात आले असून तलावातील

| May 24, 2014 01:05 am

गावासाठी एखादा उपक्रम हाती घेऊन विकासाला हातभार लावणे हे आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावे लागेल. असे कार्य नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे करण्यात आले असून तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम परिसरातील सिंचन क्षमतेत वाढ होण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
नांदगाव हा सततचा अवर्षणग्रस्त तालुका मानला जातो. उन्हाळ्यात आठवडय़ातून एकदा नळांना पाणी येते. पाण्यासाठी जनावरांचे स्थलांतर ठरलेले. याच तालुक्यातील मांडवड या गावालगत असणाऱ्या कुंभारखान तलावात कित्येक वर्षांपासून गाळ साचला होता. गाळ काढल्याशिवाय पर्याय नाही असे लक्षात आल्यावर जिल्हा परिषदेत कार्यरत अभियंते व मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून हा विषय ग्रामस्थांसमोर मांडला. गाळ काढल्याने काय फायदा होईल हे पटवून दिल्यावर ग्रामस्थांनीही या उपक्रमास होकार दर्शविला. सरपंच प्रकाश अहिरे, विकास संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आहेर, संचालक महारु आहेर, मार्गदर्शक विठ्ठल आबा आहेर, महारू आहेर, माजी अध्यक्ष उमाकांत थेटे, सदस्य खंडू थेटे, एकात्मिक पाणलोट संस्थेचे मधुकर परगय्ये, ग्रामसेवक जे. के. वाघ आदी ग्रामसभेस उपस्थित होते.
ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे मांडवड बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे नक्की झाले. परंतु कामाच्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झाला. गाळ काढण्यासाठी जेसीबी यंत्राच्या खर्चाची जबाबदारी हंसराज वडघुले यांनी घेतली. ‘शिरपूर पॅटर्न’चे जनक सुरेश खानापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून नांदगाव शहरात जल परिषद आयोजित करण्यात आली होती. या शिरपूर पॅटर्नचा अवलंब करून सुमारे ३० लाख लिटर पाणी जमा होऊ शकेल इतपत कुंभारखान तलावात सुमारे १० फुट खोल खोदाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रत्यक्ष कामाला कोणताही गाजावाजा न करता सुरूवातही करण्यात आली. सध्या जेसीबी यंत्राच्या सहाय्याने काम सुरू असून पहिल्या दिवशी १४०, दुसऱ्या दिवसी २७५, तिसऱ्या दिवशी २९८ ट्रक याप्रमाणे गाळ काढण्यात आला.
मांडवड बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर अनेक वर्षांपासून बंधाऱ्यात साचलेल्या मातीचे काय करावे असा प्रश्न समोर होता. मात्र वडघुले, प्रकाश आहेर, राजेंद्र आहेर, संपत थेटे, विठ्ठल आहेर यांनी हा प्रश्न चुटकीसारखा सोडविला. बंधारा परिसरातील शेतकऱ्यांनी हवी तितकी माती घेऊन जाण्याचे आवाहन करताच गरजू शेतकरी माती घेऊन गेले. मराठा सेवा संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मांडवड ग्रामस्थ यांच्या वतीने मांडवड बंधाऱ्याचा होणारा कायापालट लक्षात घेऊन परिसरातील लक्ष्मीनगर, साकोरा यासह तालुक्यातील इतर बंधाऱ्यांचीही अशाप्रकारे दुरूस्तीची मागणी करण्यात येऊ लागली. लक्ष्मीनगरच्या सरपंच सिंधुबाई जाधव यांनी असा प्रकल्प गावासाठी राबविण्याची तयारी दर्शविली आहे.
या उपक्रमामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासह जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था होऊ शकेल. परिसरातील पाण्याची साठवण क्षमता वाढेल, विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. दुष्काळ मिटविण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून जल प्रबोधन करण्यात येत असून जिल्हाभर अशा प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. समस्याग्रस्त गावांनी पुढे यावे आम्ही नक्कीच मदतीचा हात पुढे करणार, असे आवाहन हंसराज वडघुले यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 1:05 am

Web Title: villagers battle against drought
Next Stories
1 कांदा बियाण्यांच्या तुटवडय़ामुळे उत्पादक हैराण
2 विजय पांढरे यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी
3 खासगी शाळांतील शिक्षकांचे पगार अखेर ऑनलाइन!
Just Now!
X