धावत्या रेल्वेत एका महिलेचे दागिने व रोख पैसे पळविणाऱ्या, तिघांपैकी एकाला गोंडउमरी येथील गावकऱ्यांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.ही घटना शनिवारी गोंडउमरी रेल्वेस्थानकात घडली.
गोंदिया येथील दुलाली गोपालकुमार बोस, चंद्रपूरवरून गोंदियाला जाण्यासाठी बल्लारपूर-गोंदिया रेल्वे गाडीतून, प्रवास करीत होत्या. सकाळी दहाच्या सुमारास गोंडउमरी रेल्वेस्थानकाजवळ त्यांना आपली बॅग लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली.
त्यावेळी चोरटा गाडीच्या प्रसाधनकक्षात लपला होता. गाडी गोंडउमरीवरून गोंदियाकडे निघाली तेव्हा चोरटय़ाने चेन ओढून गाडी थांबवली तोपर्यंत महिलेचे रडणे सुरूच होते. गाडी थांबताच चोरटा पळून जात असल्याचे भाऊराव पाऊलझगडे यांना दिसले. त्यांनी भ्रमणध्वनीवरून मित्र विनोद कोरे यांना माहिती दिली.  त्यापाठोपाठ विनोद कोरे, कैलास चांदेकर, गोपाल कमलेकर आणि अन्य दोघांनी पाठलाग करून चोरटय़ाला पकडले. त्याला चोप देत येथे परत आणले व पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याजवळ पोलिसांना ८००० रुपयेरोख मिळाले.  सोनसाखळी, दोन आंगठय़ा, दोन रिंग आणि ४००० रुपये रोख चोरून दुसरे दोन चोरटे पसार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात एकूण तिघे होते, अशी माहिती दुलाली बोस यांनी दिली. पोलिसांनी घटनेची नोंद करून आरोपी कुंदनकुमार अर्जुन शहा याला रेल्वे पोलीस विभागाचे मडावी यांच्या स्वाधीन केले.