देऊळगावराजा तालुक्यातील खल्ल्याळ गव्हाण येथील सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे विद्यालयातील शिक्षक यु.एन.इंगळे यांना शाळा प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने निलंबित केल्याच्या निषेधार्थ बुधवारी तेथील गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकून शाळा प्रशासनाचा निषेध केला.  
खल्ल्याळ गव्हाण येथील या विद्यालयात आठवी ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेतील शिक्षक इंगळे हे विज्ञान, आयसीटीसह इतर विषय शिकवितात. शाळेचे मुख्याध्यापक खंडागळे यांनी या शिक्षकाचा चुकीचा अहवाल संस्थाध्यक्षांकडे पाठविला. अध्यक्षांनीही कुठलीही शहानिशा न करता इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून शाळेत भौतिक सुविधांचा अभाव असून इंग्रजीसह इतर विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देणे असे प्रकार शाळेत घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शिक्षक इंगळे यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे, तसेच शाळेत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन केले. या आंदोलनात गणेश दंदाले, राधाकिसन दंदाले, सुधाकर दंदाले, विनोद बकाल, संदीप दंदाले, श्रीकृष्ण दंदाले, ज्ञानेश्वर शेळके, विनोद खंडागळे, गणेश गायकवाड, दिलीप बकाल, निलेश दंदाले व बद्रीनाथ जोशी यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.