गेली चाळीस वर्षे विनय आपटे नावाचं एक पर्व, मराठी-इंग्रजी रंगभूमी, मराठी व हिन्दी मालिका आणि मराठी-हिन्दी चित्रपटांमध्ये सातत्याने घडत होते. नट, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून विनय आपटे यांनी चतुरस्र प्रतिभेची छाप सोडली आहे. त्यांच्या अनेक हृद्य आठवणींना उजाळा देण्यासाठी मंगळवार, १७ जून रोजी सायंकाळी ७.३०  वाजता, रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे ‘विनय.. एक वादळ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम बोलतोय’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘मित्राची गोष्ट’, ‘अफलातून’ ‘एक लफडं, न विसरता येणारं’ अशा काही नाटकांतील निवडक प्रसंग आणि गाणी रोहिणी हट्टंगडी, स्वाती चिटणीस, अतुल परचुरे, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, राजा देशपांडे, शरद पोंक्षे, मुक्ता बर्वे, सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, गिरीश ओक, संजय नार्वेकर, चिन्मय मांडलेकर, अदिती सारंगधर आदी कलाकार सादर करणार आहेत. याशिवाय स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, शोभा बोंद्रे, विजया जोगळेकर-धुमाळे, सुधीर गाडगीळ, मंगेश कदम, राकेश हांडे, शीतल तळपदे, भरत दाभोळकर आणि अन्य या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण आणि प्रसारण ‘झी मराठी’ वाहिनीतर्फे केले जाणार आहे. कार्यक्रम हा केवळ निमंत्रितांसाठी आहे.