विख्यात हृदयशल्यविशारद नीतू मांडके यांच्या ट्रस्टला वार्षिक एक रुपया भुईभाडय़ाने अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला परिसरात दिलेल्या भूखंडावर दिमाखात उभ्या राहिलेल्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाने अटी-शर्तीचा सर्रास भंग केल्याचे दिसत असले तरी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय मात्र थंडच आहे. भूखंड हस्तांतरणापोटी १७४ कोटी भरावे लागू नये, यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या अंबानी रुग्णालयाने भूखंडाच्या मूळ वाटपाच्या अटींचे उल्लंघन केल्यानंतरही त्याची साधी दखलही घेण्यात आलेली नाही.
अत्यल्प दरात भूखंडाचे वितरण करताना शासनाकडून अटी टाकल्या जातात. मात्र त्या अटींचे सर्रास उल्लंघन करीत अंबानी रुग्णालयाने गिफ्ट शॉप, स्पा, ब्युटी सलून, फूड कोर्ट, रिलायन्स कंपनीची कार्यालये, बिझनेस सेंटर, तयार कार्यालये उभारली आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्यानंतरही रुग्णालयातील हा वापर सुरूच आहे. याबाबत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु साधी नोटीसही या रुग्णालयावर बजावण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हा भूखंड नीतू मांडके यांच्या ‘मालती वसंत हार्ट ट्रस्ट’ला वितरीत करण्यात आला होता. मात्र मांडके यांचे अकाली निधन झाल्यानंतर अपूर्ण रुग्णालय पूर्ण करण्यासाठी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने जानेवारी २००९ मध्ये २९१ कोटी रुपये खर्च केले. नीतू मांडके यांच्या पत्नी अलका मांडके यांना कायम ठेवून मूळ दोन विश्वस्त बदलण्यात आले. शासनाच्या परवानगीशिवाय हा बदल करण्यात आल्याबद्दल तत्कालीन उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसही बजावली. असा बदल केल्यावर ट्रस्टला बाजारमूल्याच्या ७५ टक्के रक्कम भूखंडाची किंमत म्हणून अदा करावी लागते आणि ती १७४ कोटी रुपये इतकी होते. त्यास न्यायालयात आक्षेप घेण्यात आला आहे. मालती वसंत हार्ट ट्रस्टच हा व्यवहार पाहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसे असल्यास या रुग्णालयाला भूखंड वितरणाच्या घातलेल्या सर्व अटी लागू होतात आणि त्याचे पालन केले जात नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे उपनगर जिल्हाधिकारी कार्यायातील सूत्रांनी मान्य केले.
सर्वात महागडे रुग्णालय
रुग्णालय हे फायद्यासाठी न चालविता धर्मादाय संस्था म्हणून चालविण्यात यावे, अशी प्रमुख अट आहे. या अटीनुसार १५ टक्के विनामूल्य सेवा आणि १५ टक्के सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दराने सेवा देण्याची तरतूद आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या चटईक्षेत्रफळ निर्देशांकातही वाढ करून देण्यात आली आहे. उर्वरित खाटांना किती आकार लावावा, यासाठी रुग्णालयाला मुभा असल्याचे त्यात नमूद असले तरी त्याचाच पुरेपूर फायदा उठविला जात असून हे उपनगरातील सर्वात महागडे रुग्णालय ठरले आहे.