सध्या नागपूरचे राजकीयदृष्टय़ा वजन बरेच वाढले आहे. पूर्वी अधून मधून येणारे व्हीआयपी आता नित्यनेमानेच येऊ लागले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागपुरात येणाऱ्या व्हीआयपींच्या सेवेसाठी तीन रुग्णवाहिका नेहमीसाठीच सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या तीन रुग्णवाहिकांमध्ये प्रत्येकी एक फिजिशियन, शस्त्रक्रिया तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ, दोन अन्न तपासणी अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ परिचारिका, सहायक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहेत. या चमूमध्ये मेडिकल, सुपर स्पेशालिटी आणि मेयोतील डॉक्टर्स आणि अन्य कर्मचारी राहणार आहेत. यापूर्वी नागपुरात राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्र्यांचा नागपुरात दौरा असायचा तेव्हाच मेडिकल, मेयो आणि सुपरमधील डॉक्टरांची चमू तयार ठेवण्यात येत असे. बऱ्याचदा या चमूत नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर्स व अन्य कर्मचारी वेळेवर अनुपस्थित राहात असत. त्यामुळे वेळेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ उडायची. तसेच नंतर अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायची.
सध्या नागपूर हे देशात राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे स्थान झाले आहे. नागपुरातील नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. त्यांचे आठवडय़ातून एकदा नागपुरात आगमन होतेच. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री पदही नागपूरच्या वाटय़ाला आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा नेहमीच नागपुरात आगमन होणार आहे. याशिवाय केंद्रातील अन्य मंत्र्यांचे नागपुरात सतत आगमन होत असते. तसेच राज्यातील अन्य मंत्र्यांचेही यापुढे नागपुरात आगमन होणार आहे. यावरून नागपुरात यापुढे व्हीआयपींची सतत वर्दळ राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या सोयीसाठी तीन रुग्णवाहिका चोवीस तास सज्ज ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मेडिकलचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मुरारी सिंग यांनी दिली. या तीन चमूंपैकी एका चमूचे नेतृत्व मेडिकलमधील डॉ. वंदना अग्रवाल करणार आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री नागपुरातील दौरा निश्चित झाल्यानंतर त्याची माहिती मेडिकल व मेयो प्रशासनाला पाठवण्यात येत असे. त्यानुसार प्रशासन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करत असे. आता मात्र वेळेवर ही भानगड राहू नये, यासाठी कायमस्वरूपी चमू तैनात ठेवण्यात येणार आहे.
वेळापत्रकानुसार नेमणूक झालेल्या डॉक्टर्स व संबंधित कर्मचाऱ्यांना त्या वेळेत आपले कर्तव्य बजवावे लागणार आहे.
विशेष म्हणजे या चमूत नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची चूक अक्षम्य असते. अशी चूक आढळून आल्यास त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली जाते, असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.