नाशिक केम्ब्रिज विद्यालयात विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी अटक झालेल्या शिक्षकास नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर, महापालिका शिक्षण मंडळाने शहरातील सर्व शाळांसाठी विशाखा समितीची स्थापना करण्याबरोबर बाल लैंगिक अत्याचारासंदर्भात कारवाई करण्याबाबत एका परिपत्रकाद्वारे सूचित करण्याची तयारी केली आहे.
नाशिक केम्ब्रिज विद्यालयातील कॅम्लो लामा या शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छळवणूक केली जात होती. इयत्ता सहावी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थिनींशी शिक्षकाने अश्लील वर्तन केले. हा प्रकार उघड झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने प्रारंभी शिक्षकाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पालक व मनसेने आवाज उठविल्यानंतर तसेच शिक्षण विभागाकडून कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर त्या शिक्षकाला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. लामा विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यास अटकही करण्यात आली. या प्रकरणामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. त्याची दखल महापालिका शिक्षण मंडळाने घेतली आहे. शहरातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये भविष्यात असे गैरप्रकार घडू नयेत म्हणून विशाखा समिती स्थापना करण्याची सूचना केली जाणार आहे. बाल लैंगिक अत्याचारासंदर्भातील प्रकरणात व्यवस्थापनाने स्वत: कारवाई करावी, असे परिपत्रकाद्वारे सूचित केले जाणार असल्याचे प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले.
दरम्यान, सेंट फ्रान्सिस विद्यालयाने अनधिकृतपणे लादलेल्या शुल्कवाढी संदर्भात व्यवस्थापनाकडून तीन दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे. याबाबत संस्थेने कारवाई न केल्यास शाळेची मान्यता काढण्यात येईल, असा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे. सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या शुल्कवाढीवरून पालकांनी केलेल्या तक्रारीवरून शिक्षण मंडळाने हायस्कूलला नोटीस बजावली आहे. शुल्कवाढ करण्याआधी शिक्षण विभागाची परवानगी घेतली आहे का, विलंबाने शुल्क भरल्यास दंड का आकारण्यात येतो, वेगवेगळ्या नावाखाली पालकांकडून शुल्क का आकारण्यात येते, वह्या-पुस्तके व गणवेशाची शाळेतून खरेदी करण्याची सक्ती का, आदी प्रश्न नोटिसीमध्ये उपस्थित करण्यात आले आहे. हायस्कूलमध्ये स्थापन केलेल्या पालक शिक्षक संघ कार्यकारिणीवर मंडळाने आक्षेप नोंदविला आहे. तसेच, हायस्कूल प्रशासनाच्यावतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अद्याप शासकीय मान्यता मिळालेली नाही, विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशाखा समिती गठित झाली की नाही, याकडे लक्ष वेधले. विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेण्यात येतात, त्या संदर्भातील कागदपत्रे मागविण्यात येतात, मात्र शिष्यवृत्ती मिळत नाही. तर कागदपत्रे जातात कुठे, असा सवाल मंडळाने केला आहे.