विश्वकोश हा केवळ बंद कपाटात न राहता त्यातील माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी विश्वकोशातील नोंदींच्या वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विश्वकोशाचे चाहते अशोक कुलकर्णी यांनी विश्वकोशाची पालखी चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूल येथे आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे सहकार्य या कार्यक्रमास लाभले होते.
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विश्वकोशातील त्यांच्यावर असलेल्या नोंदीचे वाचन या वेळी कमला मेहता अंध विद्यालयातील निकिता सोनावणे, कोमल गवस व जुई देशमुख यांनी ब्रेल लिपीतून वाचली. यानंतर ध्वनिफितीवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
 विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड आणि एकनाथ आव्हाड यांनी या स्पर्धेचे संयोजन केले होते.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र कन्या’ ही ध्वनिफित प्रदान करण्यात आली. ‘चरित्र कोश’ या स्पर्धेत पूजा फरांदे हिला पारितोषिक मिळाले. तिने प्रसिद्ध पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्यावरील नोंदीचे वाचन केले तर कमला मेहता अंध विद्यालयाची विद्यार्थिनी निकिता सोनावणे हिलाही विजेतपद मिळाले.