घटनेचे वास्तव अभ्यासून तसेच त्यावर चिंतन करूनच माझ्या लिखाणाचे कथानक उभे राहते. मी शब्दांच्या फडामध्ये रमणारा आहे. टीकाकारांनी माझ्या लेखनावर कितीही टीका केली तरी मराठीसह अन्य भाषकांनी माझ्या लिखाणाला दाद दिली आहे, असे मत ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी आगरी महोत्सवातील मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.
आगरी महोत्सवातील एका कार्यक्रमात रविप्रकाश कुलकर्णी यांनी पाटील यांची मुलाखत घेतली. माझ्या लेखनाला टीकाकारांनी मान्यता द्यावी याची मी कधीच वाट पाहत नाही. माझ्या भूमीमुळे, रणभूमीमुळे मी घडलो. या भूमीत जे घडले ते मी स्वत: झोकून पाहिले. तेथील वास्तवाची दाहकता समजून घेतली. या वास्तवतेचे सार मी माझ्या शब्दांतून उतरवले आहेत. मराठीसह बहुतांशी समीक्षकांना माझे लिखाण आवडते. संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडल्यानंतर अनेकांना त्या ऐतिहासिक घटनेचे वास्तव कळले. महानायक कांदबरीचे चौदा भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. एखादा विषय हाती घेतल्यानंतर नवनिमिर्तीची दालने मला दिसू लागतात. त्यामुळे कथानकाचा एक नवीन आविष्कार वाचकांना मिळतो, असे पाटील म्हणाले. पानिपत, झाडाझडती कादंबऱ्यांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बंगाली भाषक अन्य भाषकांच्या साहित्याला मान देत नाहीत. पण त्यांनी माझ्या साहित्याचा गौरव केला आहे. शब्दामध्ये रमल्यानंतर माणूस हळूहळू सिनेमाकडे वळतो. कोल्हापूरच्या मातीचे ते वेड आहे. अशाच एका नाटकाचे लिखाण सुरू आहे. त्याला योग मिळत नसल्याने ते अपूर्ण आहे, असे कुलकर्णी यांच्या प्रश्नात पाटील म्हणाले.