स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने येत्या ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर आधारित विवेकानंद साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली हे संमेलनाध्यक्ष असून सार्थ शती समारोह समिती-महाराष्ट्र प्रांतातर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनासाठी महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरातून सुमारे दीड हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. संमेलनात विवेकानंदांच्या साहित्याशी संबंधित विविध विषयांवरील परिसंवाद आणि सत्रे होणार असून यात डॉ. सदानंद मोरे, तरुण विजय, स्वामी बुद्धानंद, राहुल सोलापूरकर तसेच सार्ध शती समारोह, महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष व शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ग्रंथदिंडी आणि सायंकाळी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सास्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
उद्योजक ए. जी. पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या संदर्भात अधिक माहिती आणि प्रवेशासाठी ९४२२६४९२३९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संमेलनप्रमुख अरुण करमरकर यांनी केले आहे.