* ‘मेक इन इंडिया’ची घोषणा प्रत्यक्षात उतरणार
* तरुणांना वेिल्डग, सुतारकाम आदींचे प्रशिक्षण मोफत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असलेले तयार मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एक योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील होतकरू तरुणांना रेल्वेच्या कारखान्यांत मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. ठरावीक दिवसांच्या काही कार्यशाळांमधून तरुणांना रेल्वे कामगारांकडून हे धडे मिळणार असून रेल्वेतर्फे त्यांना प्रशस्तिपत्रक देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मंगळवारपासून सुरू झालेल्या रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडय़ात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
देशातील सुशिक्षित तरुणांपुढे रोजगाराची समस्या असताना वेिल्डग, फिटर, सुतारकाम, टर्नर आदी कामे करण्यासाठी खूपच कमी तरुण पुढे येताना दिसतात. ‘आयटीआय’सारख्या काही संस्था वगळता अशा पद्धतीची कामे शिकवणाऱ्या संस्थाही नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांना ही कामे शिकणे कठीण जाते. मात्र आता रेल्वेसाठी लागणारी कुशल तंत्रज्ञांची फौज तयार करण्यासाठी विविध विद्यापीठांबरोबर रेल्वे करार करत असताना दुसऱ्या बाजूला अशा महत्त्वाच्या कामांसाठीही रेल्वे काही अभ्यासक्रम तयार करत आहे. मात्र हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिक स्वरूपातील असून ते थेट रेल्वेच्या कारखान्यांमध्येच शिकता येणार आहेत.रेल्वेच्या सर्व विभागीय कारखान्यांमध्ये आणि डिझेल व विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या इंजिनांच्या कार्यशाळांमध्ये तरुणांसाठी खास ‘स्कील डेव्हलपमेण्ट’चे वर्ग घेण्याची योजना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आखली आहे. या योजनेद्वारे वेिल्डग, सुतारकाम, लेथ मशिनवरील प्रशिक्षण, टर्नर, फिटर आदी कामांमध्ये रस असलेल्या काही तरुणांची एक तुकडी तयार करण्यात येईल. या तरुणांना रेल्वेच्या कारखान्यांमध्ये रेल्वे कामगारांच्या देखरेखीखाली ही सर्व कामे शिकता येणार आहेत. या प्रशिक्षणानंतर संबंधित तरुणांना रेल्वेतर्फे प्रशस्तिपत्रक देण्याचा विचारही रेल्वे करत आहेत. मात्र त्यांना रेल्वेत नोकरी मिळण्याची कोणतीही हमी नसेल, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. हे प्रशिक्षण किती महिन्यांचे असावे, एका वेळी एका कारखान्यात किती तुकडय़ांना प्रशिक्षण द्यावे, याबाबतची चर्चा रेल्वेमध्ये सुरू आहे. या बाबतची अधिकृत घोषणा १६ मे ते ९जून यादरम्यान चालू असलेल्या रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडय़ादरम्यान होण्याची शक्यता आहे.