जुन्या पिढीतील नामवंत व्हॉलिबॉलपटू व महाराष्ट्र शूटिंगबॉल असोसिएशनचे माजी पदाधिकारी आकाराम राऊ पाटील तथा दाजी यांचे काले या त्यांच्या गावी आज सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कायम हसतमुख व मनमिळाऊ असलेल्या आकाराम पाटील यांनी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये व्हॉलिबॉल खेळाचा प्रशिक्षणासह प्रचार व प्रसार केला. त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.
आकाराम पाटील हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे चांगले मित्र होते. महाराष्ट्र शूटिंगबॉल असोसिएशनमध्ये आकारामदाजी प्रतिष्ठेच्या पदावर ठसा उमटवून असताना पवार हे असोसिएशनचे सदस्य होते. कराड येथे कार्यक्रमानिमित्त येणारे शरद पवार कायमच ‘आकाराम पाटील, तुमच्या गावात आलोय, किमान ओळख तरी द्या’ अशी हाक व्यासपीठावरूनच देत असत. आकाराम राऊ पाटील हे राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलिबॉलचे खेळाडू होते. राष्ट्रीय स्तरावर अनेकदा त्यांनी आपल्या खेळाची नामी चुणूक दाखवून दिली होती. अनेक प्रतिष्ठेच्या सामन्यात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी दाखवली. राष्ट्रीय स्तरावर कराडच्या लिबर्टी संघाला विजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ते या विजयी संघाचे कर्णधार होते. आकाराम पाटील यांनी येथील शनिवार पेठेतील नावाजलेल्या अजंठा क्रीडा मंडळाची स्थापना केली. ग्रामीण भागातील तरुणांना व्हॉलिबॉलचे धडे देण्याचे त्यांना जणू वेडच होते. अगदी उतारवयातही तगडय़ा खेळाडूंना मान खाली घालावयास लावणारी त्यांची खेळी वाहवा मिळवून असे. ते सातारा जिल्हा शूटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष होते. दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व विलासराव पाटील-वाठारकर यांच्याशी त्यांची जवळीक होती. यशवंतरावांचे खंदे कार्यकर्ते म्हणून दाजींचे योगदान आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री व दिवंगत लोकनेत्या प्रेमलाताई चव्हाण, सहकारमहर्षी यशवंतराव मोहिते, पी. डी. पाटील, जयवंतराव भोसले या दिग्गज राजकारण्यांशी त्यांचा स्नेह होता.