विधान परिषदेवर नागपूर पदवीधर मतदारसंघातून प्रतिनिधी पाठविण्यासाठी उद्या, शुक्रवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या सहाही जिल्ह्य़ांमध्ये मतदान होणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. निवडणुकीत १४ उमेदवार नशीब अजमावत असून त्यात महायुतीचे प्रा. अनिल सोले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव तायवाडे आणि आंबेडकररिस्ट रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये निवडणूक रिंगणात आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून ४ वाजता मतदान पूर्ण होईल. यासाठी प्रशासनातर्फे मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तीनही प्रमुख उमेदवारांनी जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
या उमेदवारांनी गेल्या पंचवीस दिवसांपासून जोमात प्रचार सुरू केला असून मतदारांशी संपर्क केला. भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीने गडकरी यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी जोर लावला आहे. या निवडणुकीत अनिल सोले (भाजप), बबनराव तायवाडे (काँग्रेस), किशोर गजभिये (अपक्ष) या तीन प्रमुख उमेदवारांशिवाय चंद्रकात गेडाम, महेंद्र निंबार्ते, पांडुरंग डबले, अर्चना महाबुधे, तीर्थराज हिरनखेडे, अमोल हाडके, नारायण पाटील, राजेंद्र लांजेवार, अब्दुल मजिज सिद्दिकी, गोरुल पांडे आणि राजेंद्र कराळे आदी उमेदवार रिंगणात आहेत. जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढण्यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकी घेतल्या असून कार्यकत्यार्ंना सूचना देण्यात आल्या आहेत.
बुथवर पोलिंग एजंट म्हणून जाणाऱ्या कार्यकर्त्यांंची पक्षातर्फे निवड करण्यात आली आहे.
गणेशपेठेतील भाजपच्या कार्यालयात सकाळपासून कार्यकर्त्यांंची धावपळ बघायला मिळाली. सव्वा दोन लाख मतदार असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे उद्या ठरणार आहे.

अनिल सोले- पदवीधर मतदारसंघात नितीन गडकरी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली कामे, देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आणि महापौर म्हणून शहरात केलेली विकास कामे बघता मतदार भाजपला मतदान करतील, अशा विश्वास महापौर अनिल सोले यांनी व्यक्त केला. अन्य प्रमुख उमेदवारांशिवाय माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाली असली तरी गेल्या पंचवीस दिवसांपासून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीवर माझा विजय निश्चित आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन सोले यांनी केले.

बबन तायवाडे- गेल्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरलो आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून त्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांंनी या निवडणुकीसाठी मेहनत घेतली आहे. शिवाय, गेल्या अनेक वर्षांंपासून शिक्षणक्षेत्रात काम करीत असल्यामुळे यावेळी मतदार मतदान करतील, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार प्राचार्य बबन तायवाडे यांनी व्यक्त केला.

किशोर गजभिये- गेल्या वर्षांभरापासून केलेली मतदार नोंदणी, मतदारांशी घरी जाऊन केलेला संपर्क आणि शिक्षणक्षेत्रात केलेले काम, या भरवशावर माझा विजय निश्चित आहे. नितीन गडकरी यांचे वर्चस्व या मतदारसंघावर असले तरी यावेळी परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी असून यात सुज्ञ मतदार मतदान करीत असतात. बहुजन समाज आता शिक्षणाबाबत जागृत झाला असून ते यावेळी जास्तीत जास्त मतदान करतील, असा विश्वास आहे. पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक असल्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांनी केले.