जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयात आता मतदारांच्या सोयीसाठी मतदार मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनिल माळी यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. या केंद्रात मतदारांकडून विहीत नमुन्यात अर्ज लिहून घेणे, छायाचित्र मतदार ओळखपत्र तयार करणे, त्याचे वाटप करणे ही कामे होणार आहेत. नायब तहसीलदार या केंद्राचे नियंत्रक असतील.
जिल्ह्य़ाची मतदार यादीची माहिती देताना माळी यांनी सांगितले की जिल्ह्य़ातील मतदारांची एकूण संख्या ३० लाख ८८ हजार ६९६ आहे. त्यातील फक्त २ लाख ३० हजार ४५४ मतदारांची नावे आहेत मात्र छायाचित्रे नाहीत. छायाचित्रासहित मतदारांची नावे असण्याची जिल्ह्य़ाची टक्केवारी ९३ टक्के इतकी असून ती राज्यात सर्वाधिक आहे. राज्याची टक्केवारी ८५ टक्के आहे.
मतदार यादीतील सर्व मतदारांची छायाचित्रे जमा व्हावीत यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुक्यात मतदार मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिले, त्याप्रमाणे ही केंद्र स्थापन करण्यात आली असल्याचे माळी यांनी सांगितले.
शहरात २० टक्के मतदार छायाचित्राविना
छायाचित्र असलेल्या मतदारांची संख्या नगर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त आहे. नगर शहर मतदार संघात एकूण मतदार २ लाख ७५ हजार १३२ असून त्यातील तब्बल ५५ हजार ८३६ मतदार छायाचित्र नसलेले आहेत. ग्रामीण मतदार शहरी मतदारांपेक्षा जास्त जागृत असल्याची प्रतिक्रिया यावर प्रशासनात व्यक्त होते आहे.