भायखळा
मतदारसंघांच्या फेररचनेमध्ये संपूर्ण चिंपोकळी मतदारसंघ, माझगाव आणि नागपाडा मतदारसंघातील काही भाग भायखळा मतदारसंघात समाविष्ट झाला. आता हा मतदारसंघ माझगाव, नागपाडा, रे रोड, फेरबंदर, मुंबई सेंट्रल, बकरी अड्डा, डॉकयार्ड, चिंचपोकळी, घोडपदेव आणि दारुखाना असा विस्तारला आहे. मुस्लीमबहुल विभागांचा या मतदारसंघात समावेश आहे.
पूर्वीच्या चिंचपोकळी मतदारसंघातून कुख्यात गुंड अरुण गवळीने बाजी मारत विधानसभा गाठली होती. मात्र २००९च्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसचे मधु चव्हाण यांच्या पारडय़ात मते टाकली आणि ते विधानसभेत गेले. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पदपथांवरील अतिक्रमण, उद्याने व मैदानांचा रखडलेला विकास, वाहतूक कोंडी आणि वाहने उभी करण्यासाठी नसलेली जागा असे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत.
मुंबईतील इतर भागांप्रमाणेच येथेही खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक हैराण आहेत. नायगाव परिसरातील १४ बीडीडी चाळींच्या विकासाच्या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. दारुखाना परिसरात अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, माफिया राज असे अनेक गंभीर प्रश्न आजही कायम
आहेत.
दारुखाना परिसरात जलवाहिनी टाकून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका आणि बीपीडीची परवानगी मिळविली. दिग्विजय मिल पत्राचाळीचे गृसंकुलात रुपांतर करण्यात यश. विभागातील उपकरप्राप्त इमारतींसह म्हाडा, पालिका शाळा, खासगी शाळा, बीआयटी चाळी, पोलीस वसाहतींची दुरुस्ती. घासबाजारातील पालिकेच्या मैदानाचे थीम पार्कमध्ये रुपांतर करण्यासाठी ७५ कोटींची तरतूद.  श्रावणबाळ योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यश.
                           काँग्रेस आमदार मधु चव्हाण

अपुऱ्या नागरी सुविधांमुळे मुंबईची पुरती वाट लागली आहे. इमारत दुरुस्ती मंडळाची सूत्रे हाती असताना मोडकळीस आलेल्या तब्बल ३५० इमारतींची दुरुस्ती करून दिली. तसेच म्हाडावर असताना कायद्यात बदल करून मूळ रहिवाशांना पुनर्रचित इमारतींमध्ये १८० चौरस फुटाऐवजी २२५ चौरस फुटांचे घर मिळवून दिले. तब्बल नऊ हजार घुसखोरांना संक्रमण शिबिरातून बाहेर काढले. दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात धाडले.
                      भाजप उमेदवार मधु चव्हाण
ल्ल विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांना काँग्रेसने पुन्हा एकदा या मतदारसंघातून संधी दिली आहे. तर भाजपने मधु चव्हाण यांना रिंगणात उतरवून काँग्रेसला आव्हान दिले आहे. अरुण गवळीची कन्या आणि अ. भा. सेनेच्या नगरसेविका गीता गवळी निवडणूक लढवित आहेत. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुलदीप पेडणेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच विधानसभेत जाण्यासाठी गीता गवळी उत्सुक असून त्यांनी कामाचा सपाटा लावला आहे. मात्र येथे भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगण्याची शक्यता आहे.