ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड अशा तीन तालुक्यांमध्ये विभागलेल्या या विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशा तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत होत असून २००९च्या निवडणुकीत परस्परांविरुद्ध लढणारे किसन कथोरे, गोटीराम पवार आणि वामन म्हात्रे पुन्हा एकदा एकमेकांचा सामना करीत आहेत. फरक इतकाच की या वेळी त्यांचे पक्ष बदललेले आहेत. पुनर्रचना झालेल्या मुरबाड मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीने अंबरनाथचे आमदार किसन कथोरे यांना संधी दिली होती. त्यामुळे मुरबाडचे तत्कालीन आमदार गोटीराम पवार यांनी बंडखोरी करून अपक्ष लढत दिली तर वामन म्हात्रे मनसेचे उमेदवार होते. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम केलेले किसन कथोरे भाजपचे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीने आपले घडय़ाळ गोटीराम पवार यांच्या मनगटावर बांधले आहे. राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने बदलापूरचे नगरसेवक आशीष दामले यांनी पालिकेतील निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. युतीचा घटस्फोट होण्याआधीच वामन म्हात्रे यांनी विधानसभा लढविण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे बदलापूरमधील सेनेचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. गेली २५ वर्षे युतीने महाराष्ट्रातील सत्ताकारणात कार्यरत असलेल्या सेना-भाजपचा घटस्फोट यंदाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान झाला असला तरी बदलापूरमध्ये या दोन पक्षांनी पालिकेत यापूर्वीच एकमेकांच्या विरोधात राजकारण केले आहे. त्यातूनच काही काळ भाजप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत पालिकेतील सत्ता हस्तगत केली होती. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्कारावा लागल्याने भाजपने मुरबाडवरील आपला हक्क सोडून द्यावा, असा शिवसेनेचा आग्रह होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देण्याचा चंग वामन म्हात्रे यांनी बांधला आहे. मात्र राष्ट्रवादीतल्या अनेक समर्थकांसह किसन कथोरेंसारखा मोहरा हाती लागल्याने भाजपची ताकदही वाढली आहे. सेना आणि भाजप या दोघांच्या भांडणात आपला लाभ होईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे गोटीराम पवार बाळगून आहेत. मात्र काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने तसेच आशीष दामले यांच्या बंडखोरीमुळे त्यांनाही वाटते तितकी ही निवडणूक सोपी नाही. गेल्या पाच वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, क्रीडासंकुल, प्रशस्त शासकीय कार्यालये आदी अनेक प्रकल्प मार्गी लावल्याने किसन कथोरे यंदा विकासाच्या मुद्दय़ावरच निवडणूक लढवीत आहेत तर कथोरे यांनी व्यक्तिश: नव्हे तर सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे प्रकल्प साकारले, असा गोटीराम पवार समर्थकांचा दावा आहे.  
* बदलापूर शहर मुंबईला चौपदरी रस्त्याने जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बारवी धरण विस्तारीकरण प्रकल्प मार्गी लागल्याने जवळपास दुप्पट पाणीपुरवठा परिसरातील शहरी भागांसाठी उपलब्ध होणार आहे. शिवाय शासनाकडून भोज धरण बदलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी घेतले आहे. सुधारित पाणीपुरवठा तसेच भुयारी गटार योजना सुरू आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांचेही काँक्रीटीकरण मार्गी लागले आहे. पालिका हद्दीतील एकमेव ग्रामीण रुग्णालय बदलापूर येथे कार्यरत झाले आहे. मुरबाड शहराची पाणीपुरवठा योजना, ग्रामीण भागात वीज जोडण्या, तीर्थक्षेत्र विकास आदी अनेक कामे झाली. माळशेज घाटाचा बारमाही पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जात आहे. काही प्रकल्प अर्धवट असून येत्या दोन वर्षांत ती पूर्ण होतील.  
    किसन कथोरे, भाजप  
* शहरी आणि ग्रामीण भागांत विभागलेल्या या मतदारसंघातील अनेक गावांमधील वीज आणि पाणीपुरवठय़ाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार आहे. मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे शेतकऱ्यांच्या जमिनीवरील एमआयडीसीचे अन्यायकारक आरक्षण उठवून त्यांचे सातबारे कोरे करून देण्यात पुढाकार घेणार आहे. बदलापूर शहरातील सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा जपण्यासाठी कै. नानासाहेब चापेकरांचे स्मारक तसेच बंदिस्त नाटय़गृह उभारणार आहे. तसेच येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध विषय शाखांच्या महाविद्यालयांसाठी मान्यता मिळविणार आहे.
    गोटीराम पवार, राष्ट्रवादी  
* बदलापूर शहरात बोटॅनिकल गार्डन, नाटय़गृह, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार आहे. तसेच पूर्वेकडे रेल्वे स्थानकालगत असलेल्या जागेत उद्यान तसेच पार्किंगची व्यवस्था करणार आहे. रेल्वे उड्डाण पुलावर ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी सरकते जिने, बीएसयूपी प्रकल्प पूर्ण करून गोरगरिबांना घरे देणार. मुरबाडमधील पाणी योजना मार्गी लावून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार. तसेच उद्यान, क्रीडांगण, खुले नाटय़गृह आदी प्रकल्प राबविणार आहे.
    वामन म्हात्रे, शिवसेना
उमेदवार
भाजप- किसन कथोरे, * शिक्षण- ११वी अनुत्तीर्ण, * मालमत्ता- जंगम-  १ कोटी ३८ लाख ४९ हजार ५६२, स्थावर- २ कोटी ३ लाख २ हजार २५५
राष्ट्रवादी- गोटीराम पवार, * शिक्षण- एसएससी अनुत्तीर्ण, *  मालमत्ता- जंगम- ७२ लाख ३७ हजार ३८५, स्थावर- ५ कोटी ६३ लाख ९४ हजार ३३
शिवसेना – वामन म्हात्रे,* शिक्षण-  एच.एस.सी, * मालमत्ता- जंगम- १ कोटी ३९ लाख ६६ हजार १६७, स्थावर – ९ कोटी ७४ लाख ८६०