ओवळा-माजिवडा मतदारसंघात लोकमान्यनगर, वर्तकनगर, समतानगर, वसंतविहार, घोडबंदर परिसर आणि मीरा-भाईंदर यासारख्या परिसराचा समावेश होतो. गेल्या विधासभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रताप सरनाईक या मतदारसंघातून निसटत्या मताधिक्याने विजयी झाले होते. सरनाईक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुधाकर चव्हाण यांनी जोरदार टक्कर दिली होती. यंदा या निवडणुकीत शिवसेनेतर्फे प्रताप सरनाईक, भाजपतर्फे संजय पांडे, काँग्रेसतर्फे प्रभात पाटील, राष्ट्रवादीतर्फे हणमंत जगदाळे आणि मनसेतर्फे सुधाकर चव्हाण, असे पाच तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद आहे. आमदार म्हणून सतत चर्चेत कसे राहायचे हे सरनाईक यांना पक्के ठावूक आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात ते परिचित आहेत. असे असले तरी विकासकामांपेक्षा या मतदारसंघातील निवडणूक वेगळ्याच कारणाने अधिक चर्चेत आहे. एका ऑस्ट्रेलियन महिलेसोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने नेमका हाच मुद्दा घेऊन त्यांचे विरोधक प्रचार करताना दिसत आहेत. या मुद्दय़ाच्या चित्रफिती सध्या सोशल मीडियावरून फिरत असून ‘अशा आमदाराला पुन्हा निवडून देणार का’, असा सवाल त्यामध्ये उपस्थित केला जात आहे.
या मतदारसंघात सुमारे दीड लाख उत्तर भारतीय मतदार असल्याने भाजपने ठाण्यातील अपक्ष नगरसेवक संजय पांडे यांना उमेदवारी दिली आहे. या मतांवर आणि मोदी लाटेवर त्यांच्या विजयाची मदार असणार आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रभात पाटील या मीरा-भाईंदर महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका असून त्या भाईंदर परिसरातील रहिवाशी आहेत. या भागात सुमारे एक लाख ६२ हजार मतदार आहेत. या मतदारांवर काँग्रेस उमेदवाराची मदार आहे. राष्ट्रवादीने या मतदारसंघातून ठाणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांना रिंगणात उतरवले आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांशी असलेले सलोख्याचे संबंध ही जगदाळे यांची जमेची बाजू असून वर्तकनगर परिसरातील काँग्रेस कार्यकर्तेही त्यांच्या प्रचारात जोमाने उतरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. लोकमान्यनगर, वर्तकनगर, घोडबंदर भागात जगदाळे चांगला संपर्क राखून आहेत. मागील निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे िरगणात उतरलेले गंगाराम इंदीसे यांनी जगदाळे यांना पािठबा दिला आहे. त्यांची हक्काची मते या मतदारसंघात आहेत. सुधाकर चव्हाण यांचे शिवाईनगर या परिसरात चांगले प्रस्थ आहे. त्यामुळे मनसेचे इंजिन जितके चालेल तितका सरनाईक यांचा धूर निघेल, अशी चर्चा आहे.
* ठाणे शहराच्या धर्तीवर मीरा-भाईंदरसाठी पाण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारून स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाण्यात मेट्रो सुरू  करण्यासाठी केलेल्या पाठपुरव्यास यश मिळाले असून ही मेट्रो मीरा-भाईंदपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाणे आणि मीरा-भाईंदर अनधिकृत धोकादायक इमारतीमधील रहिवाशांसाठी क्लस्टर डेव्हलमेंटच्या माध्यमातून हक् काची घरे देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मीरा-भाईंदर येथे तरणतलाव बांधून तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
प्रताप सरनाईक, शिवसेना
* पाणी व्यवस्थेचे नियोजन आणि वितरणासाठी स्वतंत्र यंत्रणेची निर्मिती करणे, स्वच्छता आणि आरोग्य यंत्रणेची उपलब्धता, उत्तम रस्ते आणि सक्षम व सुरक्षित वाहतूक यंत्रणा, सर्व सुविधायुक्त शैक्षणिक केंद्रे, रोजगारनिर्मिती, झोपडपट्टीमुक्त मतदारसंघ, पुरातन वारसा, कला व सांस्कृतिक जपवणूक व नैसर्गिक सौंदर्याचे संवर्धन करणे, क्रीडा संकुल आणि आंतरराष्ट्रीय स्टेडिअम उभारणे आदी कामांना प्राधान्य देणार आहे.
    हणमंत जगदाळे, राष्ट्रवादी
उमेदवार
मनसे- सुधाकर चव्हाण,ल्ल  शिक्षण- एसएससी. * मालमत्ता- जंगम- ४ कोटी ९१ लाख ८ हजार ८३२, स्थावर- ११ कोटी ८० लाख २१ हजार ४३२.
शिवसेना- प्रताप सरनाईक, ल्ल  शिक्षण- दहावी,  * मालमत्ता- जंगम-  ७ कोटी ३६ लाख २३ हजार ६४३, स्थावर- ९ कोटी १४ लाख ४ हजार.
भारतीय जनता पार्टी – संजय पांडे, ल्ल  शिक्षण- एचएससी, * मालमत्ता- जंगम- २५ लाख २० हजार,  स्थावर- १ कोटी ७० लाख
काँग्रेस- प्रभात पाटील -ल्ल  शिक्षण-एसएससी, * जंगम-१ कोटी ६९ लाख १९ हजार ४०७, स्थावर- १ कोटी ७० लाख.
राष्ट्रवादी- हणमंत जगदाळे -ल्ल  शिक्षण- एसएससी,  * जंगम- २४ कोटी ४२ लाख ९९ हजार ९६९, स्थावर- २५ कोटी ९ लाख ६ हजार ६००