News Flash

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात रंगतदार लढत

शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विजयाचा भगवा फडकविताना यंदा शिवसैनिकांसह नेत्यांना मोठी कसरत करावी लागेल, असे चित्र सध्या दिसू लागले आहे.

| October 14, 2014 06:35 am

ठाणे शहर
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विजयाचा भगवा फडकविताना यंदा शिवसैनिकांसह नेत्यांना मोठी कसरत करावी लागेल, असे चित्र सध्या दिसू लागले आहे. सुशिक्षितांचा भरणा असलेला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी अस्मितेचा मानला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारा एक मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे वरवर सुरक्षित वाटणारा असा हा मतदारसंघ युती तुटल्यामुळे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. ठाणे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक चुरसही याच मतदारसंघात पाहावयास मिळत असून या ठिकाणी होणाऱ्या पंचरंगी लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
सुरक्षित भासणाऱ्या या मतदारसंघातून उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी शिवसेनेत अनेक जण इच्छुक होते. पक्षाचे उपनेते अनंत तरे, महापालिकेतील सभागृहनेते नरेश म्हस्के यांची नावे सुरुवातीला आघाडीवर होती. मात्र, काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकाला पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात पक्षात काहीसा नाराजीचा सूर असला तरी ही नाराजी दूर करण्यात आमदार एकनाथ िशदे यांना काही प्रमाणात यश आले आहे. फाटक यांच्यामुळे ठाण्याची महापौर निवडणूक शिवसेनेलाजिंकणे सोपे गेले. त्याची बक्षिशी म्हणून त्यांना ही उमेदवारी देण्यात आली. असे असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती तुटल्याने भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातून संजय केळकर यांना िरगणात उतरविल्याने शिवसेनेची डोकेदुखी काही दिवसांपासून वाढली आहे. नौपाडा, पाचपाखाडी यासारख्या भागांतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते केळकर यांच्या प्रचारासाठी आक्रमकपणे उतरले असून शहरातील गुजराती, मारवाडी व्यापाऱ्यांच्या मतांच्या ध्रुवीकरणासाठी गुजरातवरून भाजपच्या नगरसेवकांना पाचारण करण्यात आले आहे. ठाण्यातील हे गुजराती मतदार शिवसेनेचे परंपरागत मतदार म्हणून ओळखले जातात.  या मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीच्या जोरावर विजयाची आशा फाटक बाळगून आहेत.  राष्ट्रवादीने या मतदारसंघातून निरंजन डावखरे यांना िरगणात उतरवले असून काँग्रेसने येथून नारायण पवार यांना उमेदवारी दिली आहे.  
नारायण पवार यांच्या उमेदवारीमुळे निरंजन डावखरे काहीसे अडचणीत सापडले असले तरी घोडबंदर, ढोकाळी, राबोडी या पट्टय़ातील मतांच्या ध्रुवीकरणासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेने येथून नीलेश चव्हाण यांना उमेदवारी दिली असली तरी अंतर्गत साठमारीमुळे मागील पाच वर्षांत या मतदारसंघात या पक्षाची अवस्था फारच दयनीय बनली आहे.
* ठाणे शहरातील दळणवळणाचा प्रश्न सोडविणे हे माझे प्राधान्य असणार आहे. हा संपूर्ण मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून या परिसराचा विकास हे माझे ध्येय असणार आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सॅटीससारखा प्रकल्प उभा करण्यात आला. या स्थानकाला पर्याय म्हणून विस्तारित ठाणे स्थानकाचा प्रकल्प उभा राहावा, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. गेली अनेक वर्षे यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत असून शिक्षण संस्था, वैद्यकीय क्षेत्रात माझा राबता राहिला आहे. त्यामुळे ठाणे शहरात एखादे शैक्षणिक विद्यापीठ उभे राहावे, असा माझा प्रयत्न असणार असून उच्च शिक्षणाच्या संधी येथील विद्यार्थ्यांना ठाण्यातच उपलब्ध व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे.
    रवींद्र फाटक,  शिवसेना
* गेल्या २५ वर्षांनंतर ठाण्यातील रहिवाशांना कमळाच्या चिन्हावर मतदान करण्याची संधी मिळणार आहे. ठाणेकर ही संधी सोडतील असे मला वाटत नाही. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे अशा नेत्यांची परंपरा ठाणे शहराला लाभली आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य ठाणेकर ही परंपरा कायम राखतील, असा माझा विश्वास आहे. पैसे आणि ताकदीच्या जोरावर निवडणुक लढविणाऱ्यांपैकी मी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहरांचा विकास स्मार्ट सिटीच्या धर्तीवर करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये ठाणे नगरीचा समावेश करण्याचा माझा प्रयत्न राहील.   
    संजय केळकर भाजप
उमेदवार
भाजप- संजय केळकर, शिक्षण- वाणिज्य शाखेची पदवी, मालमत्ता- जंगम- १७ लाख ७५ हजार ५२३, स्थावर- १ कोटी २९ लाख  
शिवसेना-रवींद्र फाटक, शिक्षण- एफवायबीए, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, , मालमत्ता -जंगम- २४ कोटी ३५ लाख ५ हजार ८४७, स्थावर – ३६ कोटी ८१ लाख ३८ हजार ३५९.
राष्ट्रवादी काँग्रेस – निरंजन डावखरे, शिक्षण- एलएल.बी. मालमत्ता- जंगम- ५ कोटी ८१ लाख ९१ हजार ५४९, स्थावर- ११ कोटी ८८ लाख ८ हजार ९६३
काँग्रेस-नारायण पवार, शिक्षण- बी.कॉम.,  मालमत्ता -जंगम- जंगम- ७ लाख, स्थावर – २ कोटी १९ लाख ६० हजार.
मनसे-  नीलेश चव्हाण- शिक्षण- डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग, मालमत्ता- जंगम- ४४ लाख ६१ हजार ७६१ स्थावर- ४ कोटी ६ लाख ९० हजार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 6:35 am

Web Title: voter indicator thane city
Next Stories
1 शिवसेनेसाठी धोक्याची घंटा
2 सेना-राष्ट्रवादीची प्रतिष्ठा तर भाजपचे अस्तित्व पणाला
3 सिंधी मतांच्या ध्रुवीकरणासाठी कलानी-इदनानी समेट
Just Now!
X