वरळी
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून शिवसेनेचे दत्ताजी नलावडे सलग चार वेळा विजयी झाले होते. मात्र मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आणि शिवसेना उमेदवार आशीष चेंबूरकर यांना पराभव पत्करावा लागला. शिवसेना-भाजप युतीमधील धुसफूस त्यास कारणीभूत ठरली होती. मोडकळीस आलेल्या, वरळीमधील १२१ आणि डिलाईल रोडवरील ३४ बीडीडी चाळींचा प्रश्न ना शिवसेनेला सोडविता आला ना राष्ट्रवादी काँग्रेसला. या मतदारसंघात मोठय़ा संख्येने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आले. मात्र हे सर्वच प्रकल्प अर्धवट राहिले आहेत. म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारती, गृहनिर्माण मंडळाच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. सीआरझेडमुळे कोळीवाडय़ाचा प्रश्नही रेंगाळला आहे. एकंदर या मतदारसंघात घरांचा प्रश्न बिकट बनला आहे. येथे मोठय़ा संख्येने थाटलेल्या कंपन्यांच्या कार्यालयांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाडय़ा उभ्या करण्यासाठी शोधूनही जागा मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत. वरळीतील मतदारांना भुलविण्यासाठी मैदानांमध्येच पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. परंतु पाणी गळती होऊ लागल्याने त्या बंद कराव्या लागल्या. टाक्यांनी जागा अडविल्याने मैदानही नाही आणि टाक्या बंद झाल्याने पाणीही नाही अशी अवस्था झाली आहे. फेरीवाल्यांनीही या परिसरात उच्छाद मांडला आहे. येथील लोकसंख्येत वाढ झाली असली तरी नागरी सुविधांमध्ये मात्र फारशी सुधारणा झालेली नाही.
ल्ल गेल्या पाच वर्षांत सचिन अहिर यांनी वरळीकरांना खुष करीत या मतदारसंघाची बांधणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला निकराचा लढा देऊन आपला बालेकिल्ला काबीज करावा लागेल. मात्र महायुती तुटल्याने मतांचे विभाजन झाल्यास शिवसेनेवर पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवू शकते.
मोडकळीस आलेल्या चाळींतील आणि झोपडपट्टीतील तब्बल सहा हजार कुटुंबांचे घरे देऊन पुनर्वसन केले. ६७०० गिरणी कामगारांना मिळवून दिलेल्या घरांपैकी ८०० कामगार या मतदारसंघातील आहेत. या मतदारसंघात मोनो आणि मेट्रोची सहा स्थानके मिळविण्यात यश आले. एक हजारांहून अधिक शौचालये बांधली आणि ३० बगिचे सुशोभित केले. राजीव गांधी जीवनदायी योजनेत ८९१ जणांना लाभ मिळवून दिला.
     आमदार सचिन अहिर
बीडीडी चाळी, उपकरप्राप्त चाळींची अवस्था दयनीय आहे. येथून निवडून आलेले आमदार सचिन अहिर इमारत दुरुस्ती मंडळाचे अध्यक्ष आणि गृहनिर्माण राज्यमंत्री होते. मात्र त्यांनी या इमारतींच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. या भागातील काही झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासाच्या योजना हाती घेण्यात आल्या. पण विकासक बदलून आणि रहिवाशांमध्ये तंटे निर्माण करून या योजनांना खिळ घालण्याचे काम करण्यात आले.
शिवसेना उमेदवार सुनील शिंदे
उमेदवार
काँग्रेस – दत्तात्रय नवघरे ल्ल  शिक्षण – दहावी उत्तीर्ण ल्ल मालमत्ता – जंगम ३,५०,००० रु.; स्थावर – ११,७५,५५,००० रु.
राष्ट्रवादी काँग्रेस – सचिन अहिर ल्ल  शिक्षण – बारावी ल्ल  मालमत्ता – जंगम २,६२,८७,३२४ रु., स्थावर – ३,४९,२९,६२४ रु.
शिवसेना – सुनील शिंदे ल्ल  शिक्षण – एसएससी ल्ल  मालमत्ता – जंगम ८३,९७,७८८ रु.; स्थावर -१,४३,००,००० रु
भाजप – सुनील राणे ल्ल  शिक्षण – वाणिज्य शाखेची पदवी ल्ल  मालमत्ता – जंगम ८२,२४,५३१ रु.; स्थावर ३,३४,२५,००० रु.
मनसे – विजय कुरतडकर ल्ल  शिक्षण – दहावी  ल्ल मालमत्ता – जंगम १६,३९,१४९ रु.; स्थावर – १,६३,००,००० रु.