पनवेलमधील सिडको वसाहतींमध्ये परजिल्ह्य़ातील कष्टकऱ्यांच्या मतांचा वाढता आकडा लक्षात घेऊन अलीकडच्या निवडणुकींमध्ये जात व प्रांताचे राजकारण शिजू लागले आहे. मात्र आपल्या प्रांतांमधील मतदारांना एकवटण्यासाठी सभा घ्यायच्या, त्या सभेमध्ये आपल्या मातीची शपथ द्यायची, वेळीच जातीची आण घालायची आणि भावनिक आवाहन करून या मतदारांना मतदानावेळी आपल्या गावाकडे बोलवायचे, अशी शक्कल लढविली जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी गावाकडे निघालेल्या मतदारांच्या मोटारीच पोलिसांनी थांबविल्यानंतर संबंधित उमेदवार व संबंधित राजकीय पक्षाच्या नेत्याची कशी तारांबळ उडते याचा प्रत्यय मंगळवारी रात्री कळंबोली पोलिसांना आला.
कळंबोली पोलिसांनी महामार्गावर जमाव दिसला म्हणून सतर्कता म्हणून वाहनांच्या ताफ्याजवळच्या जमावाची चौकशी केली. या चौकशीत ही मंडळी गावी चालल्याचे समजले. मात्र यामध्ये आचारसंहितेचा भंग नसेल ना म्हणून या जमावाला व संबंधित वाहनांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संबंधित जमावाच्या प्रतिनिधींनी आपल्या नेत्याला संपर्क साधला. त्या वेळी समोरून राष्ट्रीय नेत्याचा आवाज पोलीस अधिकाऱ्यांना ऐकू आला. हे राष्ट्रीय नेते रासपचे महादेव जानकर होते. साहेब आम्ही या जमावाला येण्याचाही खर्च दिला नाही. ते स्वखर्चाने गावी लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी येत असल्याचे जानकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांना सांगितले. पोलीस अधिकारी मोहिते यांनी खात्री केली आणि त्यानंतर जानकरांच्या मतदारांचा आपल्या गावचा प्रवास सुरू झाला. पनवेलच्या सिडको वसाहतींमध्ये मान-खटाव तालुक्यातील अनेक कुटुंबे राहतात. यामध्ये अनेक मतदार हे मान-खटाव तालुक्यातील आहेत. पनवेलच्या सिडको वसाहतींसारखे संपूर्ण मुंबईत मान-खटाव तालुक्यातील ८०० मतदार आहेत. या मतदारांना मान-खटाव तालुक्यामध्ये शेखर गोरे यांना मतदान करण्यासाठी जानकर यांनी सभा घेतल्या होत्या. मात्र मंगळवारच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे भविष्यात शहरी मतदारांच्या जोरावर निवडणूक लढविताना संबंधित मतदारांच्या प्रवासाची आगाऊ माहिती पोलिसांना देण्याचा नवीन धडा जानकरांना त्यानिमित्ताने मिळाला.