मतदारांना माहिती देण्यासाठी १ फेब्रुवारीपासून प्रत्येक तहसील कार्यालयात ‘मतदार मदत केंद्रे’ कायान्वित केले जाणार असून ते आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहतील. या केंद्रांवर मतदारांना मतदारयादीत नाव आहे की नाही, त्याचा तपशील, दुरुस्ती, नवी नोंदणी आदीबाबत माहिती मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी ३१ जानेवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे, त्यानुसार जिल्हय़ातील मतदारसंख्या ३१ लाख १९ हजार ४०९ आहे.
निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांनी ही माहिती दिली. दरम्यान उद्या, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जाणार असून त्यानिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. १ जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम १६ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१३ दरम्यान राबवला गेला होता. त्याच्या प्रक्रियेनंतर जिल्हय़ात १ लाख ९४ हजार ३१० मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या एकूण ३१ लाख १९ हजार ४०९ झाली आहे.
त्यातील नवमतदारांना (१८ वर्षे) छायाचित्र मतदार ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम शनिवारी सकाळी ११ वाजता नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी मतदार जागृतीबाबत प्रतिज्ञाही दिली जाईल. प्रत्येक मतदार केंद्रावर राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे.
मतदार जागृतीसाठी विविध कॉलेजमध्ये विविध स्पर्धाही घेण्यात आल्या, त्याचेही पारितोषिक वितरण नियोजन भवनमधील कार्यक्रमात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.३० वाजता वाडिया पार्क येथून मतदार जागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शाळा, कॉलेजमधील सुमारे ५०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शहरातील विविध मार्गावरून जाणाऱ्या या प्रभात फेरीचा समारोप वाडिया पार्कमध्येच होणार आहे.
 फेसबुक अकाऊंट
जिल्हय़ातील मतदारयादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच ‘डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिस’ हे फेसबुक अकाऊंटही सुरू करण्यात आले आहे. फेसबुकवरूनही संकेतस्थळ लिंकअप करण्यात आले आहे.