मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी यावेळी कमी झाल्या असल्या तरी मतदारांसाठी सारे काही आलबेल नव्हते. लोकसभा निवडणुकीत मतदान करता न आल्याने स्वत:हून पुढाकार घेऊन नावनोंदणी केलेल्यांपकी काहींचे नावच मतदारयादीत आले नाही. काहींना नोंदणी होऊनही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर नाव सापडले नाही. मात्र राजकीय कार्यकर्त्यांच्या मदतीने केलेल्या शोधाशोधीनंतर पाच-सहा इमारती पलीकडच्या पत्त्यांवर स्वत:चे नाव आढळले. वर्षांनुवष्रे एकाच पत्त्यांवरून मतदान करणाऱ्यांचेही पत्ते असेच बदलले गेले असल्याने निवडणूक आयोगाला मतदार यादी अपडेट करण्यासाठी बरीच मजल मारावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता न आल्याने मुंबई व पुण्यातील हजारो मतदारांनी राग व्यक्त केल्यावर निवडणूक आयोगाने मोठी मोहीम हाती घेऊन मुंबईतील तब्बल १ लाख ९४ हजार नव्या मतदारांची नोंदणी केली. याशिवाय मुंबई, ठाणे आणि पुणे येथील मतदारसंघातून नाव वगळण्यात आलेल्या तब्बल २६ लाख मतदारांना निवडणूक आयोगाने पत्राद्वारे नावनोंदणीचा अर्ज पाठवला होता. मात्र त्यातील साडेचार लाख पत्रे वगळता इतर सर्व पत्रे चुकीचा पत्ता किंवा मतदार दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्याने परत आली. अनेकांच्या स्लीपवर चुकीचा पत्ता छापण्यात आला होता. मात्र राजकीय पक्षांकडून होत असलेल्या छाननीमुळे अनेकांच्या घरी ही यादी-नोंदपत्रे पोहोचली व मतदान केंद्र व क्रमांक शोधून काढायला त्रास झाला नाही. मात्र नव्याने नोंदणी केलेल्यांना मात्र संपूर्ण यादीमधून नाव शोधून काढताना दमछाक झाली. ‘चारकोप येथे गेली २० वष्रे राहत असूनही पत्त्यात सोसायटीचे नाव, क्रमांक वेगळेच होते. अनेकांच्या बाबतीत असे झाले. लोकसभा निवडणुकीआधी पत्ता व नाव शोधत निवडणूक आयोगाचे कर्मचारी आले होते. पण तरीही पत्ता चुकला,’ असे एका मतदाराने सांगितले. यावेळी पहिल्यांदाच बदललेल्या पत्त्यावर नोंदणी केलेल्यांनाही हा अनुभव आला. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आदल्या दिवसापर्यंत अनेकदा पाहणी करूनही नाव न सापडल्याने यावर्षी मतदान करता येणार नाही, असे वाटले. मात्र मतदानादिवशी पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून एका ओळखीच्या राजकीय कार्यकर्त्यांची मदत घेतली तर माझा पत्ताच चुकीचा नोंदवण्यात आल्याचे कळले. मतदारयादीत नावनोंदणी झाल्याचा दिलासा आणि चुकीचा पत्ता असल्याने निराशा अशा संमिश्र भावनेत मतदान केल्याचा अनुभव डोंबिवलीतील एका मतदाराने सांगितला.
ऑगस्ट २०१४ मध्ये निवृत्तीनंतर कुलाब्याहून चुनाभट्टीत राहायला आलेल्या सुरेश चांदवणकर यांनी पत्ता व ओळख यांच्या प्रत्येकी दोन कागदपत्रांसह स्वत: व पत्नीचा अर्ज भरला. मात्र मतदारयादीत केवळ त्यांचेच नाव नोंदवण्यात आले. भाडय़ाच्या घरात असल्याने पत्त्यासाठी पत्नीच्या नावावरील कागदपत्रे देणे कठीण होते. त्याबाबत मी अर्ज भरतानाच माहिती दिली. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी मला दिल्लीला जाऊन नियमात बदल करा, असे सांगितल्याचे सुरेश चांदवणकर म्हणाले.
गेल्या पाच महिन्यात मुंबईत सुमारे दोन लाख नवीन मतदारांची नोंदणी केल्याबद्दल निवडणूक आयोग कौतुकाला पात्र असले तरी यावेळीही मतदारनोंदणी व मतदारयादीतील चुकीचे पत्ते यांच्या तक्रारी कायम होत्या.