विधानसभेसाठी उद्या बुधवारी मतदान होणार असून त्यासाठी नागपूर जिल्ह्य़ातील बाराही मतदाररसंघातील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे मंगळवारी सायंकाळपर्यंत पोहोचली होती. मतदान यंत्र व इतर साहित्य नेण्यासाठी या सर्व मतदारसंघातील वितरण केंद्रांवर अधिकाऱ्यांची दिवसभर धावपळ सुरू होती.
नागपूर जिल्ह्य़ात एकूण ४ हजार ५२ मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीच्या व्यवस्थेसाठी नागपुरात दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी दक्षिण अंबाझरी मार्गावरील कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल, दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी सीताबर्डीवरील सांस्कृतिक बचत भवन, पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी हनुमान नगरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी तेलंखेडीतील शेतकरी भवन, पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी काटोल मार्गावरील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय, उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी काटोल मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कूल आदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
काटोल विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय काटोल, सावनेर विधानसभा मतदारसंघासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर, हिंगणा विधानसभा मतदारसंघासाठी तहसील कार्यालय हिंगणा, उमरेड विधानसभा मतदारसंघासाठी नूतन आदर्श महाविद्यालय उमरेड, कामठी विधानसभा मतदारसंघासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मौदा, रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण  संस्था खैरी बिजेवाडा रामटेक आदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
नागपूर जिल्ह्य़ातील सर्व केंद्रांवर मतदान यंत्रे व निवडणूक साहित्य नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सकाळपासून गर्दी झाली होती. मंगळवारी सकाळी ९ वाजता या केंद्रांवर निवडणुकीच्या व्यवस्थेची जबाबदारी दिलेले अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा जवान हजर झाले होते. तेथे त्यांना प्रत्येक मतदान केंद्रांचे वाटप करण्यात आले. याशिवाय मतदान यंत्रे, मतदार यादी व इतर साहित्य देण्यात आले. मतदान व्यवस्थेसंबंधी माहिती देण्यात आली. मतदान यंत्रे ताब्यात घेतल्यानंतर ती तपासण्यात दुपारी कर्मचारी मग्न झाले होते. दुपारनंतर प्रत्येक केंद्रांवरील निवडणूक यंत्रणा पथके कडक सुरक्षेत बसमधून संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली. उद्या बुधवारी मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रांसह मतपेटय़ा याच केंद्रांवर परत आणल्या जातील. एका कुलूपबंद खोलीत त्या ठेवल्या जातील. तेथे चोवीस तास बंदुकधारी जवानांचा पहारा राहील.