03 June 2020

News Flash

तवेळच्या तुलनेत नाशिकमध्ये १४, तर दिंडोरीत १६ टक्क्यांनी वाढ

लोकसभेसाठी झालेल्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी काढता काढता निवडणूक यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली.

| April 26, 2014 03:00 am

लोकसभेसाठी झालेल्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी काढता काढता निवडणूक यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. मतदान प्रक्रिया संपुष्टात आल्यावर तब्बल १८ तासांनी ही आकडेवारी जाहीर करणे यंत्रणेला शक्य झाले. नाशिक लोकसभा मतदारसंघात ५९.१४, तर दिंडोरी मतदारसंघात ६३.५३ टक्के मतदान झाले. गतवेळच्या निवडणुकीचा विचार केल्यास नाशिक मतदारसंघात १४ टक्के, तर दिंडोरीत हे प्रमाण १६ टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीतील ही लक्षणीय वाढ शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक ठळकपणे अधोरेखित झाली. वाढलेल्या मतदानाचा कोणाला लाभ होणार, याबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
जिल्हा निवडणूक यंत्रणेने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम आकडेवारी शुक्रवारी दुपारी जाहीर केली. या आकडेवारीने मतदानात घसघशीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत नाशिक मतदारसंघात ४५ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाची ही टक्केवारी ५९.१४ पर्यंत पोहोचली. यावेळी १५ लाख ८९ हजार ७१५ मतदारांपैकी ९ लाख ४० हजार १५६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मागील निवडणुकीत ही संख्या केवळ सहा लाख ५६ हजार ८९३ इतकी होती. या दोन्ही मतदानाचा अभ्यास केल्यास गतवेळच्या तुलनेत यंदा २ लाख ८३ हजार २६३ अधिक मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्काना उधाण आले आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यास शहरवासीयांपेक्षा ग्रामीण मतदारांनी अधिक हातभार लावल्याचे लक्षात येते. या मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात (६३.८२ टक्के), देवळाली (६८.९२) आणि इगतपुरीमध्ये सर्वाधिक (६८.९२) मतदान झाले. उर्वरित शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी ५२ ते ५५ टक्क्यांच्या दरम्यान सीमित राहिली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी (५२.८७ टक्के), नाशिक पश्चिम (५५.४३), तर नाशिक पूर्व मतदारसंघात (५३.३८) टक्के मतदान झाले. एकूण मतदानात पाच लाख २५ हजार ३४३ पुरुष, तर चार लाख १४ हजार ८१३ महिला मतदारांनी मतदान केले.
सर्वसाधारणपणे मतदान अधिक झाल्यास प्रस्थापितांसाठी तो धक्का मानला जातो. गतवेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ २२ हजार मतांच्या अल्पशा फरकाने विजयी झाले होते. तेव्हा मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती. यावेळी उमेदवार जसे बदलले, तसे काही जणांचे पक्षही बदलले. गतवेळी मनसेचे उमेदवार यंदा शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरले. यंदा जवळपास १५ उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेस आघाडीतर्फे छगन भुजबळ, महायुतीकडून हेमंत गोडसे, तर मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्यात मुख्य लढत झाली. पण आम आदमी पक्षाचे विजय पांढरे आणि माकपचे अ‍ॅड. तानाजी जायभावे हे किती आणि कोणाची मते खेचणार, हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. मागील निवडणुकीत आप अस्तित्वात नव्हता. एरवी मतदानाच्या दिवशी झोपडपट्टी व वस्तीतील परिसरात मतदारांच्या रांगा दिसत असतात. परंतु, यंदा उच्चभ्रू वसाहतींसह ग्रामीण भागातील मतदार उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडला. त्यामुळे नेहमीपेक्षा इतरही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसले. ग्रामीण व उच्चभ्रू वसाहतीत वाढलेले हे मतदान निकालावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांकडून वेगवेगळे आडाखे व अंदाज बांधले जात आहेत.

विक्रमी मतदान कोणासाठी फायदेशीर?
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात बहुदा आजपर्यंतच्या विक्रमी मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात कळवण तालुक्यातील मतदानाच्या टक्केवारीत काही त्रुटी राहिल्याने अंतिम आकडेवारी काढताना बराच विलंब झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता या मतदारसंघात ६३.५३ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले.या मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात असले, तरी महायुतीकडून हरिश्चंद्र चव्हाण, आघाडीच्या डॉ. भारती पवार यांच्यात मुख्य लढत होत आहे. माकपची या भागात चांगली ताकद असून, डाव्या आघाडीच्या तिकिटावर हेमंत वाघेरे आपले नशीब अजमावत आहेत. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणासाठी लाभदायक ठरणार, याचे अंदाज बांधण्याचे काम एव्हाना सुरू झाले आहे. या मतदारसंघात सर्वाधिक (७२.४० टक्के) मतदान कळवण विधानसभा मतदारसंघात, तर सर्वात कमी (५३.१५) मतदानाची नोंद नांदगावमध्ये झाली. उर्वरित चांदवड विधानसभा मतदारसंघात (६२.३७), येवला (६१.२३), निफाड (६३.४९), दिंडोरी (७०.३९) अशी मतदानाची टक्केवारी आहे. एकूण १५ लाख २६ हजार ३२९ मतदारांपैकी नऊ लाख ६९ हजार ६६७ मतदारांनी मतदान केले. त्यात पाच लाख ४६ हजार ७०० पुरुष, तर चार लाख २२ हजार ९६७ महिला मतदारांचा समावेश आहे. दिंडोरी मतदारसंघाच्या इतिहासात असे मतदान होण्याची बहुदा पहिलीच वेळ आहे. महायुतीचे चव्हाण हॅटट्रिक करण्याच्या तयारीत असून, त्यांच्यासमोर आघाडीच्या डॉ. पवार यांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात कमी मतदान नोंदले गेले. परंतु दुसरीकडे आघाडीचे आमदार असलेल्या कळवण, येवला व चांदवड या ठिकाणी मतदानाची टक्केवारी साठच्या पुढे राहिली. हे संदर्भ घेत या ठिकाणी कोण बाजी मारणार, यावर चर्चा झडत असली, तरी खरे चित्र मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2014 3:00 am

Web Title: voting increased by 14 in nashik 16 in dindori compared to last election
Next Stories
1 ‘मत यंत्र’ सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात
2 नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणूक : शासकीय कार्यालयांमधील शुकशुकाट कायम
3 ..अन् पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Just Now!
X