13 July 2020

News Flash

विदर्भातील उमेदवारांचा ‘रिलॅक्स डे’

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून तर प्रत्यक्षात मतदान होईपर्यंत पायाला चक्री बांधल्यागत फिरणाऱ्या विदर्भातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी मतदानानंतरचा शुक्रवार ‘रिलॅक्स डे’ ठरला.

| April 12, 2014 01:14 am

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून तर प्रत्यक्षात मतदान होईपर्यंत पायाला चक्री बांधल्यागत फिरणाऱ्या विदर्भातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी मतदानानंतरचा शुक्रवार ‘रिलॅक्स डे’ ठरला. काही उमेदवारांनी हा दिवस कुटुंबासोबत घालविला, तर काही उमेदवारांनी निवडणूक निकालाचा अंदाज बांधण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चेत घालविला. विदर्भातील सर्वच प्रमुख उमेदवारांच्या ‘रिलॅक्स डे’बाबत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत साधलेला संवाद.  
लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कोणत्या भागात किती मतदान झाले यावर काथ्याकूट केल्यावर शुक्रवारी सर्वच उमेदवार ‘रिलॅक्स’ झाले. मात्र, प्रमुख दावेदारांचे लक्ष दिल्लीकडे लागले असून आपणच संसदेत पाऊल टाकू, अशी आशा या सर्वाना आहे.
 गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या धुमश्चक्रीमुळे उमेदवार व त्यांचे समर्थक तहान-भूक विसरून प्रचाराला लागले होते. उमेदवारी वेळेवर जाहीर झालेल्यांनीही तयारी आधीपासूनच केली होती. प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरल्यापासून मतदान होईपर्यंत उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. दिवस- रात्र एक करून कोणत्याही स्थितीत मतदारांशी संपर्क व्हावा, याची धडपड या उमेदवारांनी केली. पहाटे उठून तयार होणे आणि सकाळी ७ वाजतापासून घराबाहेर पडणे असा गेल्या पंधरवडय़ाचा दिनक्रम आता पूर्ववत झाला. ‘तारे जमीं पर’ आले. भाजपचे नितीन गडकरी यांच्या वाडय़ावर सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी होती. काही प्रमुख नेते गडकरी यांच्या वाडय़ावर पोहोचल्यावर त्यांनी चर्चा केली. कुठे कसा प्रतिसाद मिळाला याचा अंदाज त्यांनी घेतला. त्यानंतर दिवसभरचा वेळ त्यांनी कुटुंबासोबत घालवला. ‘कोणतेच ‘टेन्शन’ नाही. निवडणुकीत परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे सुरू आहे. दोन-तीन दिवस असेच चालेल. मतमोजणीसाठी एक महिन्याचा वेळ असला तरी, महाराष्ट्रात होणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार असल्याने प्रचारासाठी जावे लागेल. यामुळे एक महिन्यात काय करावे याचे नियोजन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रात निवडणुका झाल्यानंतर दिल्लीला जाणार आहे,  असे गडकरी यांनी यांनी सांगितले.
 विलास मुत्तेमवार यांचा दिवस मात्र उशिरा सुरू झाला. एकदम ‘रिलॅक्स मूड’मध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले. प्रचार, पक्षांतर्गत मतभेद आणि मानापमान सांभाळण्यात  पंधरा दिवस गेल्यानंतर आज त्यांनी आराम केला. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील विविध भागात पदयात्रा केल्याने थकवा आला. पायात गोळे आल्यामुळे आराम करणार असल्याचे मुत्तेमवार यांनी सांगितले. काही दिवस आराम करणार असून त्यानंतर पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे अन्य राज्यात किवा महाराष्ट्रात प्रचाराला जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, असे मुत्तेमवार म्हणाले.
रामटेक लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी-बरिएमंचे उमेदवार व काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक आता काँग्रेस व राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात १७ आणि २४ एप्रिलला मतदान होत आहे. त्यांच्याकडे तामिळनाडू आणि पॉंडेचरी या राज्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तेथेही ते प्रचारासाठी जाणार आहेत. गेले पंधरा दिवस प्रचार केल्याने दगदग झाली असली व विश्रांती घ्यावी, असे वाटत असले तरी ते शक्य नसल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. पक्षासाठी काम करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. निवडणूक ही एक प्रक्रिया झाली. निवडणूक झाली म्हणजे काम संपत नाही. ते सतत सुरू असते, असेही ते म्हणाले.
काल निवडणूक होताच गावातील नागरिकांनी आज सकाळपासूनच घरी येऊन ठाण मांडले. माझे कर्तव्य म्हणून गावातील नागरिकांसोबत गाठीभेटी घेत आहे. येत्या २४ एप्रिलला मुंबईत निवडणुका होत आहेत. तेथील सेना-भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी दोन-तीन दिवसानंतर जाणार असल्याचे रामटेक लोकसभा मतदार संघातील सेना-भाजपचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी सांगितले. प्रचारामुळे खूप दगदग झाली आणि थकवाही आला आहे. पण, असे असतानाही आपण लोकांच्या संपर्कात राहणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
अमरावती – मतदान संपल्यानंतर निवांत क्षण घालवता येतील, अशी स्थिती अमरावतीचे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांची नाही. राज्यातील पुढल्या दोन टप्प्यातील निवडणूक प्रचारात उभय नेत्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनीत राणा यांनी अमरावतीतच राहून कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेण्याचा कार्यक्रम ठरवला आहे. अडसूळ हे सेनेचे दुसऱ्या फळीतील नेते असल्याने शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचा जावे लागणार आहे. अमरावतीतील मतदार यादीतील घोळाविषयी कायदेशीर लढाईसाठी दिल्लीलादेखील जाण्याची सज्जता त्यांनी केली आहे. डॉ. राजेंद्र गवई हे रिपाइंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडले आहेत. उर्वरित दोन टप्प्यातील मतदार आटोपल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी ते अमरावती मतदार संघात दौरा करणार आहेत. पंच्याहत्तर टक्के ‘रिलॅक्स’ झालो असे, त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या नवनीत राणा या अमरावतीतच मुक्कामी राहणार आहेत.
वर्धा -सलग महिन्याभराच्या प्रचाराच्या धामधुमीतून मतदानाअंती सुटका झालेल्या प्रमुख उमेदवारांनी आजची सकाळ निवांतपणे घालविल्याचे दिसून आले. मतमोजणीस महिनाभराचा अवकाश असण्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे सागर मेघे यांचा मनसुबा घरीच विश्रांती करण्याचा आहे. ते म्हणाले सध्या काहीच ठरविलेले नाही. दोन तीन दिवस मतदारसंघातच भेटीगाठी घेणार असून त्यापुढील वेळ कुटुंबीयांना देण्याचा मानस आहे.
 भाजपचे रामदास तडस म्हणाले, आजवर निवडणुकीनंतर कधीही मी पर्यटनावर गेलेलो नाही. आयुष्यातील ही माझ्यासाठी सर्वात मोठी निवडणूक ठरली. ती लोकांनीच लढवली. त्यामुळे पुढील आठवडाभर मी मतदारसंघातच फि रणार आहे. पालिकेची सत्ता आमच्याच गटाकडे असल्याने नागरिकांच्या समस्यांवर विचारविनिमय करणार आहे.
 गोंदिया – माझ्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक संपली असली तरी व्यस्तता काही संपणार नाही. मतदानापासून मतमोजणीपर्यंतचे ३५ दिवस व्यस्त  राहणार आहे. राज्यातील राष्टवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या उमेदवारांकरिता प्रचाराकरिता २४ एप्रिलपर्यंत वेळ देणार आहे. त्यानंतर मंत्रालयातील काम पाहणार आहे. यासोबतच आपले गृहक्षेत्र भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ातील जनसंपर्क ही सुरूच राहणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
भाजप-सेना महायुतीचे उमेदवार नाना पटोले गुरुवारचा दिवस काहीशी शांतता घेऊन आला. शुक्रवारपासून त्यांची दिनचर्या कशी राहणार अशी विचारणा केली असता ते म्हणाले, माझ्या दिनचय्रेत काहीच बदल होणार नाही कारण त्यांच्या नेहमीच्या प्रमाणे भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ात होणा-या सामूहिक विवाहांसह विविध सामाजिक उपक्रमांची तयारी सुरू आहे.भाजपच्या वरिष्ठांचे आदेश झालेच तर इतरत्र शेजारील राज्यात प्रचारासाठी जाणार आहे.
आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रशांत मिश्रा म्हणाले, १६ मे पर्यंतचे वेळापत्रक तयार झालेले आहे. १२ एप्रिलला दिल्ली जाणार असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या ई.व्ही.एम.मशीन मध्ये झालेल्या गडबडीच्या प्रकरणाला सुप्रीम कोर्टापर्यंत नेणार आहे. याविषयी न्यायिक लढा देण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. यासोबतच मुंबई येथे मयंक गांधी आणि वाराणसी येथे अरिवद केजरीवाल यांच्या प्रचारात सहभागी होणार आहे.
यवतमाळ -मतदान आटोपल्यावर निकालाची प्रतीक्षा करीत वेळ घालवण्यापेक्षा आपण लगेच मराठवाडय़ातील िहगोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारासाठी रवाना झाल्याचे यवतमाळ -वाशीम मतदारसंघातील काँॅग्रेस उमेदवार शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. निवडणुकीचा ताण असला आणि विश्रांतीची गरज असली तरी राजककारणातील लोकांना क्षणोक्षणी युध्दाचा प्रसंग अनुभवावा लागतो. विश्रांती घेण्यापेक्षा आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडणे अधिक महत्त्वाचे आहे. २४ एप्रिलपर्यंत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारकार्याची जबाबदारी जबाबदारी सांभाळतानाच वेळ काढून आंध्रप्रदेशातील पुटृपूर्ती येथे सत्यसाईबाबांच्या समाधी दर्शनास आणि  चन्नईजवळ  पॉंडेचेरी येथे योगी अरिवदाच्या आश्रमात जाणार असल्याचेही मोघे यांनी सांगितले. या मतदारसंघातील महायुतीच्या सेना उमेदवार भावना गवळी यांनी सांगितले की, मतदान झाल्यानंतर अजिबात विश्राती घ्यायची नाही. मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील महायुतीच्या उमदेवारांच्या प्रचारासाठी िभगरीसारखे फिरत राहायचे कुठलेही पर्यटन नाही, देवदर्शन नाही. निवडणुकीचा थकवा काढणे नाही व पक्ष देईल, ती जबाबदारी पूर्ण करणे असा आपला कार्यक्रम आहे.
चंद्रपूर – गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आणि काल झालेल्या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर आज या मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी दिवसभर विश्रांतीसोबतच कार्यकर्त्यांकडून मतदानाविषयी माहिती घेण्यात वेळ घालवला. भाजपचे उमेदवार हंसराज अहीर आज दिवसभर घरीच होते. त्यांनी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मतदानाची माहिती दिवसभर घेतली. आजही त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी होतीच. काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे आज वरोऱ्यात होते. आज सकाळी उशिरा त्यांचा दिवस सुरू झाला. तेही दिवसभर विधानसभानिहाय मतदानाची माहिती घेण्यात व्यस्त होते. आपचे उमेदवार वामनराव चटप यांनी मात्र आज विश्रांती न घेता मतदारसंघाचा दौरा करणे पसंत केले. आज ते वणी, आर्णी या भागात कार्यकर्त्यांच्या भेटी घेत होते. कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी हा दौरा होता असे त्यांच्या पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
गडचिरोली – गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी सुद्धा आज दिवसभर घरीच वेळ घालवला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी घरीच बसून कार्यकर्त्यांकडून माहिती घेत होते. हा मतदारसंघ नक्षलवादग्रस्त असल्याने मतदानाची अंतिम आकडेवारी आज दुपापर्यंत जाहीर झाली नव्हती. त्यामुळे उसेंडी यांनी कार्यकर्त्यांकडून माहिती घेणे पसंत केले. भाजपचे उमेदवार अशोक नेतेसुद्धा आज घरीच बसून काल झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. त्यांच्याही घरी आज कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कुठे किती मते मिळाली, कुणी काम केले व कुणी दगा दिला याची चर्चा त्यांच्या निवासस्थानी रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2014 1:14 am

Web Title: voting over candidates in vidarbha feel relax
Next Stories
1 निकालाच्या दीर्घ प्रतीक्षेमुळे उमेदवार बेचैन
2 पं. प्रभाकर देशकर अनंतात विलीन
3 शहरात शांततेत मतदान
Just Now!
X