राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाचा जिल्हाध्यक्ष निवडतांना आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाला झुकते माप दिल्याने या पदावरून गेल्या काही महिन्यांपासून भांडणाऱ्या पुगलिया व देवतळे गटाला जोरदार झटका बसला आहे. या दोघांच्या भांडणात वडेट्टीवारांनी बाजी मारून नेल्याचे आता पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काल, सोमवारी राज्यातील काही जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. या जिल्ह्य़ाचे ग्रामीणचे अध्यक्षपद प्रकाश देवतळे यांना देण्यात आले. देवतळे वडेट्टीवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचे नाव जाहीर झाल्याने येथील दोन्ही प्रस्थापित गटांना धक्का बसला आहे. प्रकाश देवतळे यांची निवड होईल, याची साधी कुणकुणही पुगलिया व पालकमंत्री संजय देवतळे यांच्या गटाला नव्हती. गेल्या दहा वषार्ंपासून या जिल्ह्य़ातील पक्ष संघटनेवर माजी खासदार नरेश पुगलिया यांचे वर्चस्व आहे. मावळते अध्यक्ष विनायक बांगडे पुगलिया गटातून बाहेर पडल्यापासून नवीन अध्यक्ष कोण, याची चर्चा पक्ष वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती.
 पुगलिया गटाने या पदासाठी गजानन गावंडे यांचे नाव दिले होते, तर ग्रामीणसाठी अविनाश ठावरी यांच्या नावाची शिफारस केली होती. पालकमंत्री देवतळे यांच्या गटाने माजी अध्यक्ष सुभाष गौर यांचे नाव समोर केले होते. या गटात राजुराचे आमदार सुभाष धोटेही सक्रीय आहेत. या दोघांनी गौर यांच्यासाठी मुख्यमंत्री, तसेच प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह धरला होता.
गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही गटांपासून अंतर ठेवून सक्रीय असलेले चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश देवतळे, पंजाबराव गावंडे व संतोष रावत यांची नावे समोर केली होती. वडेट्टीवार यांचा मतदारसंघ गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांची शिफारस ऐकली जाणार नाही, या भ्रमात पुगलिया व देवतळे गटाचे नेते राहिले. नाव निश्चित करण्याच्या वेळी प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री आपल्याला नक्की विचारतील, अशी खात्री हे दोन्ही गट बाळगून होते. प्रत्यक्षात या दोन्ही गटाला बाजूला सारून राज्यातील नेत्यांनी वडेट्टीवारांना झुकते माप दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पालकमंत्री संजय देवतळे व सुभाष धोटे हे या जिल्ह्य़ात संख्येने सर्वात जास्त असलेल्या कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. पुगलिया गटाने शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी शिफारस केलेले गजानन गावंडे माळी समाजाचे प्रतिनिधित्व करतात, हे लक्षात घेऊन राज्यातील नेत्यांनी तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे प्रकाश देवतळे यांच्या नावाला पसंती दिली असावी, अशी चर्चा आता पक्ष वर्तुळात आहे.  पालकमंत्र्यांच्या गटाने शिफारस केलेले सुभाष गौर यांचे नाव या निकषात बसणारे नव्हते. आता निवडणुका असल्याने देवतळे यांची निवड झाली असावी, अशीही चर्चा आहे.