वाई नगरपालिकेची सत्ता पुन्हा आमदार मकरंद पाटील यांच्या गटाकडे आली आहे. नगराध्यक्षा निलीमा खरात व त्यांचे पती दत्तात्रय खरात यांनी आमदार पाटील यांच्या तीर्थक्षेत्र आघाडीचे सदस्यत्व मान्य करून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका निवडणुकीनंतर वाई पालिकेत आमदार पाटील यांची सत्ता आली होती. त्यानंतर निलीमा खरात यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली होती तर उपनगराध्यक्ष म्हणून भूषण गायकवाड यांची निवड झाली होती. दरम्यान, ३० एप्रिल २०१२ रोजी नगराध्यक्षा व त्यांच्या पतीने आमदार पाटील यांच्या तीर्थक्षेत्र आघाडीला रामराम ठोकून माजी आमदार मदन भोसले यांच्या जनकल्याण आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर आमदार पाटील यांच्या तीर्थक्षेत्र आघाडीचे  डॉ. अमर जमदाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खरात दांपत्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा दावा दाखल केला होता. दरम्यान, वाई पालिकेत मागील दहा महिन्यात सर्व विकास कामे ठप्प झाली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वाई-पाचगणी-महाबळेश्वर पालिकेचे विकास कामांचे प्रस्ताव घेतले होते. वाई पालिकेने त्यात बारा कोटींचे प्रस्ताव दिले होते परंतु वाई पालिकेला निधी मिळाला नाही. मागील महिन्यात त्यांनी पाचगणी-महाबळेश्वरला निधी दिला पण वाई पालिकेला दिला नाही. काँग्रेस पक्षाधिकारातील जनकल्याण आघाडीतून शहराचा विकास शकत नाही व मुख्यमंत्री आपल्याला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे निराश होऊन आपण पुन्हा आमदार पाटील यांच्या तीर्थक्षेत्र आघाडीत प्रवेश करीत आहोत. त्यासाठी आम्ही या आघाडीचे सदस्यत्व मान्य केले असून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेला दावा तडजोडीने मागे घेतला आहे, असे नगराध्यक्षा निलीमा खरात यांनी सांगितले. जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तसेच मकरंद पाटील यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू वाई आहे म्हणून आम्ही प्रवाहात राहण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक विकास कामे प्रलंबित ठेवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे त्या म्हणाल्या.