गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ातील वैनगंगा नदीत नौका उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या १४ जणांच्या वारसांना अत्यल्प मदत मिळाली आहे. या दुर्घटनेतील मृतांना पाच लाखांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ग्रामविकास जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
उमरवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रात नाव उलटून १४ जणांचा मृत्यू झाल्याबाबतचा लघुसूचना प्रश्न आमदार डॉ. खुशाल बोपचे यांनी विधानसभेत मांडला.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळालेली मदत अत्यंत तोकडी आहे. त्यांना पाच लाखांची मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली असून अशा दुर्घटना होऊ नये म्हणून नावेतून प्रवास करणाऱ्यांना लाईफ जॅकेट घालण्याच्या सूचना दिल्या जातील.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नावेत बसल्याने उमरवाडा येथे १३ नोव्हेंबर २०१३ रोजी दुर्घटना घडली. ८ प्रवासी आणि दोन नावाडी, असे एकूण दहा जणांची क्षमता असताना नावेत ३४ जण बसल्याने नाव बुडाली. या घटनेला अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचे आढळले नाही, तसेच अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून तेथील नावेद्वारे सुरू असलेली प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून घेतला जाईल, असे जयंत पाटील म्हणाले.
डोंगा घाटाचा लिलाबाबत धोरणात्मक निर्णय सरकार घेणार का, असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी विचारला असता पाटील म्हणाले, नौका घाटाचे लिलाव जिल्हा परिषदेमार्फत केले जातात. नावेतून प्रवास करताना लोकांना लाईफ जॅकेट घालण्याच्या सूचना दिल्या जातील, असे ग्रामविकास मंत्री म्हणाले.
गोंदिया जिल्ह्य़ात सापांची तस्करी
गोंदिया जिल्ह्य़ात सापांची तस्करी सुरू असल्याचे आढळून आले. देवरी येथे वन विभाग व वन्य जीव (संरक्षण) विभागाच्या संयुक्त कारवाईत सापांच्या विषाची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील दोघांना गेल्या ६ डिसेंबरला अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून ४३ सापांना हस्तगत करण्यात आले. या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती वन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी विधानसभेत दिली. सापांची तस्करी करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करण्याबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी लघुसूचना प्रश्न मांडला. वन विभाग व वन्य जीव (संरक्षण) विभागातील रिक्त पदे महिनाभरात भरण्यात येतील. सर्पमित्रांची मोठी आहे, ते खरे असतील तर त्यांना ओळखपत्रे देऊ, सापांच्या दंशाबद्दल नुकसान भरपाईबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे डॉ. कदम म्हणाले.