पनवेल ग्रामीण रुग्णालय
पनवेलकरांचे हक्काचे सरकारी ग्रामीण रुग्णालय तांत्रिक अडचणीत अडकले आहे. सरकारचे आरोग्य विभाग सुरुवातीला ३० खाटांचे हे रुग्णालय पनवेलमध्ये उभारणार होते. मात्र या तीस खाटांच्या रुग्णालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनावेळी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी ३० खाटांऐवजी या रुग्णालयाची क्षमता १०० खाटांची करण्याची घोषणा करून हे रुग्णालय उभारण्याअगोदर तांत्रिक अडचणींच्या फेऱ्यात अडकवले. त्यानंतर या रुग्णालयाचा नव्याने सरकारदरबारी फाइल मंजुरींचा प्रवास सुरू झाला. या फाइलने दीड वर्षांच्या सरकारी कात्रीतून स्वत:ची सुटका केल्यानंतर या रुग्णालयाला १०० खाटांची मान्यता मिळविण्यात यश मिळाले. मात्र अजूनही प्रत्यक्षात १०० खाटांच्या रुग्णालयाची इमारत उभारण्यासाठी १० महिने लागणार आहेत.
पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांना व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे. तालुक्यात सरकारी रुग्णालय नसल्याने ही वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील ३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र १०० खाटांसाठी अजून किमान १० महिन्यांची प्रतीक्षा पनवेलकरांना करावी लागणार आहे. ३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडचे जिल्हाधिकारी व जिल्ह्य़ाचे आरोग्य विभागाचे शल्यचिकिस्तक यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. मात्र ३० खाटांचे रुग्णालय चालविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ व साहित्यसामग्री आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. सरकारी रुग्णालयाच्या मंजुरीप्रमाणे १०० खाटांच्या रुग्णालयाच्या इमारतीनंतर तेथील मनुष्यबळ व रुग्णालयाचे साहित्य उपलब्ध करणे कायदेशीर असणार असल्याचा विचार आरोग्य संचालकांच्या कार्यालयाने मांडला आहे. लोकहितासाठी हे रुग्णालय तात्पुरते ३० खाटांचे सुरू केल्यास तेथील बांधकामाच्या सुरू असलेल्या कामाचा फटका तेथील रुग्णांना होण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. तसेच आजमितीला पनवेलच्या उरण फाटय़ावर भाडय़ाच्या जागेत ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. ३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याची वेळ आल्यास येथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना येथे स्थलांतर करण्यात येईल. मात्र त्यामुळे नुसती जागा बदलली जाईल. मुळात येथे डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार नाही. तरीही राजकीय खटाटोपानंतरही ३० खाटांचे रुग्णालय सुरू केल्यास नवीन बाटलीत जुने पेयविक्री, असे बोलण्याची वेळ पनवेलकरांवर येणार आहे. आजही ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, सोनोग्राफी, डायलेसिस, एक्सरे, रक्त तपासणी यांसारख्या सोयीसुविधा नसल्याने सामान्य पनवेलकर येथे जाणे पसंत करत नाही. त्यामुळेच इतर खासगी रुग्णालयांचा विळखा घट्ट पनवेलकरांच्या खिशाला बसत आहे. १०० खाटांचे रुग्णालय कायदेशीररीत्या पनवेलमध्ये सुरू झाल्यास पनवेलकरांना किमान सरकारी दरात वैद्यकीय सेवा मिळतील. त्यानंतर खिसेकापूगिरी करणाऱ्या रुग्णालयांचा धंदा यामुळे मंदीत चालेल हे निश्चित आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 8:38 am