शेतमालाच्या किमतीत वाढ झाली, की महागाई वाढल्याचा आरोप करीत विरोधक आम्हाला टाग्रेट करतात. जाब विचारला जातो. मात्र शेतीसाठी लागणारे खत, मजुरी या बाबतीत विचार केला जात नाही. महागाई संदर्भात होणाऱ्या आपल्यावरील टीकेची चिंता नाही. शेतकऱ्याच्या कष्टामुळे या देशातील शंभर कोटी लोकांची भूक भागविली जाते. यामुळे शेतकऱ्याला मालाची योग्य किंमत मिळालीच पाहिजे, तो त्याचा अधिकार असल्याचे मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
वसमत येथे पूर्णा ग्लोबल टेक्सटाईल पार्क लि.च्या फेज १ प्रकल्पाचे शनिवारी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी केंद्रीय वत्रोद्योग मंत्री के. एस. राव, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, राज्यमंत्री फौजिया खान, आ. जयप्रकाश दांडेगावकर, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, आ. सुरेश जेथलीया, आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. शंकरअण्णा धोंडगे, िहगोलीचे नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती या वेळी ते बोलत होते.
पवार यांनी आ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. दांडेगावकर एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व असून पूर्णाच्या माध्यमातून जे प्रकल्प उभे केले, त्याबद्दल त्यांनी दांडेगावकर यांची स्तुती करीत सरकारची संपूर्ण ताकद दांडेगावकर यांच्या मागे उभी करू, असे आश्वासन दिले.
त्यांनी अन्नसुरक्षा कायद्याविषयी बोलताना ते म्हणाले, की जो पिकवितो त्याच्या घरात अन्नाचा घास जावा, यासाठी पुढच्या वर्षीपासून अन्नसुरक्षा कायदा सुरू करण्यात येत आहे. ज्यामुळे देशातील ८० टक्के लोकांना दोन रुपये किलोप्रमाणे गहू तर तीन रुपये किलोप्रमाणे तांदूळ देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. यासाठी १ लाख २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली.