कचऱ्याच्या ढिगावर वावरणाऱ्या मुंबईच्या पाश्र्वभूमीवर मालाडमधील प्रभाग क्रमांक ४१ शून्य कचऱ्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्थानिक नगरसेवक, इच्छाशक्ती असलेले पालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वयामुळे हे अभियान आता अंतिम टप्प्यात आले आहे.
मालाड पूर्व येथील प्रभाग ४१ अन्य सर्व प्रभागांप्रमाणेच कचऱ्याने ग्रस्त आणि त्रस्त झाला होता. प्रभागातील ३२ कचराकुंडय़ांमधून ओसंडून वाहणारा कचरा वाहतुकीलाही अडथळा बनू लागला. कचरा टाकणारे नागरिकच याबाबत पालिका विभाग कार्यालयात, तसेच स्थानिक नगरसेवक विनोद शेलार यांच्याकडे तक्रारी करीत होते. पण आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास ते तयार नव्हते.
आपल्या प्रभागातील कचऱ्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्याचा निर्णय विनोद शेलार यांनी घेतला आणि पालिका अधिकारी, दत्तकवस्ती योजनेअंतर्गत स्वच्छतेचे काम करणाऱ्या संस्थांबरोबर बैठका घेतल्या. प्रभाग क्रमांक ४१ मध्ये शून्यकचरा अभियान राबविण्याचे निश्चित झाले. कार्यकर्ते आणि पालिका अधिकाऱ्यांचे पथक सज्ज झाले. झोपडपट्टय़ा, सोसायटय़ांमध्ये अभियानाची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. परंतु सुरुवातीला रहिवाशांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. आम्ही कचरा टाकायचा कुठे, असा प्रतिप्रश्न करीत नागरिक या पथकाला फैलावर घेत होते. परंतु हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार कायम होता.
नागरिकांच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान होते. विभागामध्ये दोन वेळा घंटागाडी फिरविण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू नागरिक घरातील कचरा या गाडीतच टाकू लागले. कार्यकर्ते आणि पालिका अधिकाऱ्यांच्या पथकाच्या प्रबोधनाची मात्रा हळूहळू लागू होऊ लागली. कचराकुंडीतील कचरा कमी होत गेला आणि गेल्या वर्षभराच्या मेहनतीला फळ आले. नागरिक घंटागाडीमध्ये कचरा टाकू लागल्याने कचराकुंडय़ा रिकाम्या राहू लागल्या. दुकानदारांसाठी दुपारच्या वेळी कचऱ्याची गाडी धावू लागली. आजघडीला ३२ पैकी केवळ तीन ठिकाणी कचराकुंडय़ा उरल्या आहेत.
मात्र मोकळ्या झालेल्या या जागेवर मग अनेकांची वक्रदृष्टी वळू लागली. त्या जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विनोद शेलार यांनी तेथे फुलझाडांच्या कुंडय़ा ठेवल्या. तेथे त्यांचे कार्यकर्ते नियमितपणे गस्त घालत असतात. लवकरच उर्वरित तीन कचराकुंडय़ाही हटविण्यात येणार असून त्यानंतर हा प्रभाग शून्यकचरा परिसर म्हणून ओळखला जाईल.
या मोहिमेत विनोद शेलार यांना पालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन, सहाय्यक अभियंता विद्याधर भंडारे, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक आर्चिन वासकर, कनिष्ठ अभियंता नारायण सावंत, कनिष्ठ आवेक्षक बी. ए. राठोड, संदेश चव्हाण आणि मशीलकर यांची मोलाची साथ मिलाली. या अभियानासाठी रात्री ११ पर्यंत हे अधिकारी झोपडपट्टय़ांमध्ये जनजागृती करीत असत. अनेक वेळा अनावस्था प्रसंग ओढवले. परंतु न डगमगता या मंडळींनी ही मोहीम यशाच्या अंतीम टप्प्यात आणून ठेवली आहे.