नवी मुंबई पालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १११ प्रभागांची रचना शनिवारी सकाळी दहा वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात जाहीर केली जाणार आहे. एक प्रभाग ९ ते ११ हजार लोकसंख्येचा राहणार आहे. नवी मुंबईची एकूण लोकसंख्या सध्या ११ लाख २० हजार ५४७ आहे. याच वेळी प्रभाग आरक्षणाची सोडत काढली जाणार असून यात पहिल्यांदाच ५० टक्के महिलांसाठी आरक्षण आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ही रचना व आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई पालिकेची एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात निवडणूक आहे. त्याच्या तयारीला सुरुवात झाली असून उद्या शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून वाशीतील भावे नाटय़गृहात प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. ही रचना राज्य निवडणूक आयोगाने संगणकीय प्रणाली वापरून तयार केली असून ती नाटय़गृहात केवळ जाहीर केली जाणार आहे.
यात लोकसंख्या, क्षेत्रफळ, सीमा नकाशाद्वारे दाखविल्या जाणार आहेत. नाटय़गृहातील मोकळ्या जागेतील भिंतीवर ही रचना चिकटवली जाणार आहे. त्यानंतर १११ प्रभागांची सोडत आरक्षण काढले जाणार आहे. यात दहा अनुसूचित जाती, दोन जमाती, ३० मागासवर्गीयांसाठी राखीव असून ६९ सर्वसाधारण गटासाठी आहेत. या सर्व संर्वगात ५० टक्के महिलांना स्थान ठेवावे लागणार आहे. या रचना व आरक्षणावर १० फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविल्या जाणार असून १८ फेब्रुवारीपर्यंत त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे.
ती या महिनाअखेपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वपक्षीय उमेदवारांच्या उपस्थितीमुळे शनिवारच्या सोडतीसाठी पालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्यात बुधवारी नवी मुंबईतील बहुचर्चित एफएसआय मंजूर झाला असल्याने पक्षीय मतभेदांना उधाण आले आहे. त्याचे पडसाद या सोडतीच्या वेळी उमटू नयेत यासाठी पालिका प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. संगणकीय प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत दुपापर्यंत पूर्ण होईल असे पालिकेचे उपायुक्त व निवडणूक अधिकारी अमरीश पटनिगिरे यांनी सांगितले.