News Flash

नवी मुंबईत वारकरी भवन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बेलापूर सेक्टर ३ येथील ४०९५ चौमी परिसरात चार मजली वारकरी भवन साकारण्यात येणार आहे.

| August 29, 2014 01:18 am

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बेलापूर सेक्टर ३ येथील ४०९५ चौमी परिसरात चार मजली वारकरी भवन साकारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडला आहे.
नवी मुंबई हे सर्वसमभाव जपणारे शहर असून येथील नागरिकांमध्ये असलेला बंधुभाव वाढीस लागण्यामध्ये विविध आध्यात्मिक परंपरांचे योगदान आहे. नवी मुंबईला फार मोठा ऐतिहासिक वारसा नसला तरी येथील मूळ गांवात पूर्वीपासून जपल्या जाणाऱ्या वारकरी परंपरेने नवी मुंबईचे वातावरण समाधानी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथील गांवातून जपल्या जाणाऱ्या वारकरी परंपरेमध्ये नवी मुंबई विकसित होऊ लागल्यानंतर या ठिकाणी राहायला आलेल्या नव्या रहिवाशांची मोलाची भर पडली आणि इथली आध्यात्मिक परंपरा अधिक उन्नत झाली असून वारकरी भवनाच्या माध्यमातून दया, क्षमा, शांतीचा वावर असणारा अध्यात्माचा धागा घट्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे सांगून ही भवननिर्मिती म्हणजे त्या परंपरेचा सन्मान असल्याची भावना पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
वारकरी मंडळाचे नवी मुंबई अध्यक्ष भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर यांनी वारकरी भवन उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करून नवी मुंबईने याही बाबतीत आघाडी घेतली असल्याचा आनंद व्यक्त करीत शेकडो वर्षांचा गौरवशाली वारसा असणाऱ्या वारकरी संप्रदायाचा सन्मान केल्याबद्दल समस्त आध्यात्मिक संप्रदायांच्या वतीने पालकमंत्री महोदयांच्या मनोभूमिकेचे स्वागत करून आभार व्यक्त केले. सेक्टर ३ ए येथील भूखंड क्र. ८ वर १६ कोटी ९६ लाख रुपये  खर्च करून ४०९५ चौ.मी. बांधकाम क्षेत्रफळात बहुउद्देशीय स्वरूपात वारकरी भवनाची चार मजली भव्यतम वास्तू उभी राहत आहे. यामध्ये तळघरात २८ चार चाकी वाहनांची पार्किंग सुविधा तसेच तळमजल्यावर १० चारचाकी वाहनांची सुविधा आणि चार खोल्या असणार आहेत. पहिल्या मजल्यावर ३७९ व्यक्ती क्षमतेचे सभागृह बाजूला स्त्री व पुरुषांसाठी दोन स्वतंत्र कक्षांसह तसेच दुसऱ्या मजल्यावर १०२ व्यक्ती क्षमतेचे बाल्कनी सभागृह बाजूला स्त्री व पुरुषांसाठी दोन स्वतंत्र कक्षांसह तिसऱ्या मजल्यावर १९२ व्यक्ती क्षमतेचे सभागृह बाजूला स्त्री व पुरुषांसाठी दोन स्वतंत्र कक्षांसह उपलब्ध होणार आहे. चौथ्या मजल्यावर सद्यस्थितीत त्या इमारतीत असलेल्या संस्था, ग्रंथालयासाठी जागा उपलब्ध असणार आहे.
या चार मजली इमारतीस लिफ्टची सुविधा ठेवण्यात आलेली असून प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र स्त्री- पुरुष प्रसाधनगृह व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:18 am

Web Title: warkari bhavan in navi mumbai
Next Stories
1 बँकेत ठेवीचे अधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव मागे
2 स्लॅब कोसळण्याच्या घटनेला मुख्यंमत्रीच जबाबदार
3 दक्ष नागरिक हेच खरे पोलीस -के. एल. प्रसाद
Just Now!
X