पवन ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या इनरकॉन कंपनीच्या विरोधात गर्भगिरी डोंगर परिसरातील  कंपनी दमदाटी करून जमीन खरेदी करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बेकायदा वृक्षतोड, रस्त्यांचे नुकसान, तसेच अन्य अनेक बेकायदा प्रकार कंपनीकडून सुरू असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महेश वाघ, जनार्दन लिपाणे, नामदेव डरगे, शिवाडी डमाळे, केशव बेरड, दिलीप शिंदे, सोपान कदम, सोपान पालवे आदींनी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. कंपनीला मोठा राजकीय आश्रय आहे. त्यामुळे वारस असूनही तो नाही असे दाखवत जमिनी खरेदी करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यातून कंपनीच्या विरोधात फिर्याद होऊन गुन्हा दाखल झाला, मात्र पोलिसांकडून काहीही कारवाई झाली नाही.
वास्तविक कंपनीवर परिसरातील रस्ते दुरूस्त करून देण्याचे बंधन आहे. त्यांनी ग्रामपंचायतीचे सर्व नियम, सरकारी नियम पाळणेही आवश्यक आहे, प्रत्यक्षात मात्र यापैकी काहीही न करता कंपनी शेतकऱ्यांच्या जमिनी दमदाटी करून घेत आहे. शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला जावा, वृक्षतोड केलेल्या ठिकाणी वृक्षारोपण व्हावे, गावाच्या विकासात कंपनीने सक्रीय सहभाग द्यावा, आर्थिक मदत द्यावी, कंपनीत शेतकऱ्याचा सहभाग असावा, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना कंपनीत सामावून घ्यावे अशा परिसरातील शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
कंपनीने शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वटले नाही, त्यासंबंधी तक्रारी झाल्या आहेत, ही शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. फिर्याद दाखल होऊनही कंपनीच्या मालक किंवा संचालक, अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई होत नाही, त्यामुळे यापुढे आता ग्रामस्थ रास्ता रोको, कंपनीचे पंखे बंद करणे अशा प्रकारचे आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.