आमदार चव्हाण यांचे निवेदन
औरंगाबाद येथे विधी विद्यापीठ सुरू करण्यास सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. १५ जानेवारीपर्यंत हे विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिला. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वारंवार विनंती करूनही या मागणीकडे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे आता उपोषणाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे पत्रात म्हटले आहे.
मराठवाडय़ात विधी अभ्यासक्रमात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्माण व्हावे, म्हणून येथे विधी विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा ४ वर्षांपूर्वी झाली. सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेकडेही आमदार चव्हाण यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले. हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठवाडय़ातील आमदारांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन १ जानेवारीपर्यंत याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. तथापि, अजून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. १५ जानेवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास १६ जानेवारीपासून आंदोलन केले जाईल, असेही आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे. या पत्राची प्रत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनाही दिली आहे.
जायकवाडी जलाशयात पाणी सोडण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीतील संबंध ताणले गेले होते.
सिंचन श्वेतपत्रिकेमुळे त्यात भर पडत गेली. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार चव्हाण यांनी दिलेला हा इशारा राजकीय कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावणारा आहे.