भापकर रस्त्याचे काम रखडले
रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आंदोलन केले. त्यानंतर काम कसेबसे सुरू झाले नि पुन्हा वेगवेगळय़ा कारणांनी रेंगाळले. रस्त्यावरील वीजखांब दुरुस्तीसाठी जीटीएलला आरेखन न मिळाल्याने काम रेंगाळले, तर दुसरीकडे रुंदीकरणासाठी वृक्षतोड आवश्यक होते. ते कामही न झाल्याने आमदार शिरसाट यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या वेळी आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने रस्त्याचे काम रेंगाळल्याचा आरोप आमदार शिरसाट यांनी सोमवारी पुन्हा केला. कोणत्याही स्थितीत हे काम थांबवू नका. रस्त्यावरील लहान जलवाहिनी, विजेचे खांब, बाधित वृक्ष त्वरित काढा. टप्प्याटप्प्याने व गतीने काम पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी केल्या. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनाही काम कसे रेंगाळते याची माहिती शिरसाट यांनी दिली. या रस्त्यासाठी आयुक्तांचेच नाव देण्यात आल्याने जेवढा रस्ता रेंगाळेल, तेवढी तुमची बदनामी होईल आणि आंदोलन केले असल्यामुळे मीही अडचणीत येईल, या शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. कारण नसताना वीजखांब हटविण्याचे काम तातडीने झाले नाही. तसेच रस्त्याच्या आड येणारे वृक्ष तोडले गेले नाहीत, या बद्दलही आमदार शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृह नेते रेणुकादास वैद्य, शहर अभियंता एम. डी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांची उपस्थिती होती.