शहरातील राजगोपालचारी उद्यानात २५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन दोनदा होऊनही काम रखडले आहे. महापालिकेकडून झालेल्या कामाचे देयक मिळत नसल्याने गेल्या ४ महिन्यांपासून गुत्तेदाराने काम बंद केले असल्याची माहिती समोर आली असून, येत्या दहा दिवसांत उद्यानातील टाकीचे काम सुरू न झाल्यास २४ मे पासून नागरिकांसह उपोषण करण्याचा इशारा स्थायी समितीचे सदस्य डॉ. विवेक नावंदर यांनी दिला.
परभणी शहरास तीन वर्षांपूर्वी सुजल निर्माण योजनेंतर्गत रामेश्वरनगर व राजगोपालचारी उद्यानातील दोन टाक्यांसाठी सरकारची मंजुरी मिळाली. महापालिकेला निधीही पाठविण्यात आला. राजगोपालचारी उद्यानातील पाणी टाकीचे भूमिपूजन तत्कालीन नगराध्यक्षा जयश्री खोबे यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते झाले. कामाच्या निविदाही निघाल्या. परंतु हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. पुन्हा महापौर प्रताप देशमुख यांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वीच भूमिपूजन करण्यात आले. गुत्तेदाराने उद्यानाच्या उत्तर बाजूस मोठा खड्डा खोदून ‘बेड काँक्रीट’चे काम केले. या साठी सरकारकडून ७५ लाख निधी प्राप्त झाला.
पाण्याच्या टाकीसह शिवाजीनगर, शंकरनगर, रामकृष्णनगर, विवेकनगर, भाग्यलक्ष्मीनगर, एकता कॉलनी व समता कॉलनी या भागात पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा समावेश आहे. गुत्तेदाराने टाकीच्या पायाचे खोदकाम करून बेड काँक्रीट केले व लोखंडी पाईपची खरेदी केली. यावर गुत्तेदाराचा एक कोटीपेक्षा अधिक खर्च झाला आहे. परंतु महापालिकेकडून केवळ ४० लाखांचे देयक अदा केले. महापालिकेकडून झालेल्या कामाचे देयक मिळत नाही तोपर्यंत पुढे काम सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाणी टाकीच्या बांधकामाचा प्रश्न एप्रिल महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत डॉ. नावंदर यांनी उपस्थित केला होता. तेव्हा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी संबंधित गुत्तेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असे उत्तर दिले होते. गुत्तेदार व महापालिका यांच्यात आर्थिक नियोजन होत नसल्यानेच हे काम रखडल्याचे स्पष्ट होत आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न असल्यामुळे ते काम पूर्णत्वास घेऊन जावे, अशी अपेक्षा डॉ. नावंदर यांनी व्यक्त करून कामाला गती न मिळाल्यास २४ मेपासून उपोषण करण्याचा इशारा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला.