वादग्रस्त तालुका गटविकास अधिकारी एस. एस. कुलकर्णी हे नरेगाच्या विविध कामांना मंजुरी देण्यास सतत टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे नागरिक व सदस्य त्रस्त आहेत, अशी तक्रार भाजपच्या पंचायत समितीच्या सदस्य कांताबाई नेटके यांनी केली आहे. याचसंदर्भात येत्या दि. २५पासून उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.
गटविकास अधिकारी कुलकर्णी हे येथे हजर झाल्यापासून वादग्रस्त ठरले आहेत. त्यांना पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सर्व सदस्यांनी ठराव करून सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मात्र परत आल्यावरही त्यांनी विनाकारण अडवणूक करावयाची मनमानी करण्याची पद्धत बदलली नाही.
तालुक्यातून वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये दोन वर्षांपासून सुमारे दीड हजार प्रकरणे सर्व कागदपत्रांसह शेतक-यांनी मंजुरीसाठी सादर केली आहेत. प्रत्येक मासिक बैठकीत याबाबत सभापती, उपसभापती व सर्व सदस्य या सर्व विहिरींना मान्यता द्या असे सुचवतात, मात्र कुलकर्णी यांनी तांत्रिक कारणे देऊन त्यात टाळाटाळ चालवली आहे. केवळ विहिरीच नव्हेतर, नरेगामधून शौचालय, गाईंचे गोठे, शेळी-मेंढीपालन शेड, कुक्कुटपालन शेड याबाबतही ६०-४० निकषात मध्ये बसत नाही अशी कारणे देऊन ही प्रकरणेही प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. श्रीगोंदे, जामखेड, पारनेर या अन्य तालुक्यांमध्ये एक हजारपेक्षाही जादा विहिरींना मंजुरी मिळाली, परंतु कर्जत पंचायत समितीत ही कामे रखडली आहेत. मागच्या वर्षी फक्त ४३७ विहिरींना मंजुरी देण्यात आली, मात्र या लाभार्थींचीही शाखा अभियंता, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी अनुदान देण्यासाठी अडवणूक करीत आहेत. नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत सर्व विहिरांना उद्याच मान्यता देतो असे सांगून कुलकर्णी प्रत्यक्षात रजेवर निघून गेले आहेत. या सर्व विहिरींना येत्या दि. २४ एप्रिलपर्यंत मान्यता न मिळाल्यास दि. २५पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा कांताबाई नेटके यांनी दिला आहे.