राज्यातील कायम विनाअनुदान शाळांचे निकष बदलाचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पाळत नाहीत, असा आरोप करीत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष के. एस. जगदाळे यांनी १३ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. विनाअनुदानित शाळांचे निकष बदलाबाबत राज्य कृती समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात १८ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू आहे.  ५ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या बैठकीवेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी ३१ डिसेंबरपूर्वी निकष शिथिल केले जातील, असे आश्वासन दिले होते. दोन महिने झाले तरी या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा, त्यासाठी मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला असता त्यांना अटक करण्यात आली होती. ६ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत पुन्हा बैठक झाली असता पुढील मंत्रिमंडळातील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. सातत्याने केवळ आश्वासने मिळत असून यावर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न कृती समितीसमोर निर्माण झाला आहे.    
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समितीच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी रामनाथ मोते, चंद्रकांत पाटील, भगवान साळुंखे, ना. गो. गानार आदी शिक्षक प्रतिनिधी, आमदारांनी लाक्षणिक उपोषणे केली होती. त्यावेळी त्यांनी शासनाने हे प्रश्न मार्गी लावले नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा निर्धार केला होता. या पाश्र्वभूमीवर विनाअनुदान शाळांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व मुख्यमंत्री आश्वासन पाळत नसल्याच्या निषेधार्थ कृती समितीचे उपाध्यक्ष के. एस. जगदाळे यांनी १३ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा एका पत्रकाव्दारे दिला आहे.