सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये तसेच अंगणवाडय़ांमध्ये येत्या १५ ऑक्टोबर रोजी ‘हात धुवा दिना’चे आयोजन करण्यात आले असून यात स्वच्छता संस्कार मोहिमेत नऊ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शाळांमधून स्वच्छतेची प्रतिज्ञा आणि प्रात्यक्षिके घेण्याच्या सूचना सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी सांगितले.
संपूर्ण जगभर ‘१५ ऑक्टोबर’ हा दिवस ‘हात धुवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. निर्मल भारत अभियानाअंतर्गत सोलापूर जिल्ह्य़ात सर्व शाळांमधून प्रभातफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.निशिगंधा माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, संवादतज्ज्ञ सचिन जाधव हे या मोहिमेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी ग्रामसभांचेही आयोजन करण्यात आले असून यात स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. तुकाराम शिंदे यांनी केले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे तालुक्याच्यावतीने हात धुवादिनाचे आयोजन करण्यात आले, तर पंढरपूर येथे सिध्देवाडीत जवाहरलाल नेहरू प्रशालेत हा कार्यक्रम आयोजिला आहे. माढा तालुक्यात महाडिक महाविद्यालयात हात धुवा दिन साजरा करण्यात येणार आहे. तर, मंगळवेढा शहरात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत तसेच ब्रॅन्ड विस्टा कम्युनिकेशन संस्थेच्यावतीने वसुंधरा महाविद्यालयात हात धुवा दिन साजरा केला जाणार आहे. मोहोळ, माळशिरस येथेही ‘हात धुवा’ दिनाची तयारी केली जात आहे.